नवी दिल्ली : पश्चिम बंगालमध्ये पुढच्या वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीपूर्वी चांगलेच राजकीय पडसाद उमटू लागले आहेत. यातच भाजपाचे अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या ताफ्यावर आज दुपारी कोलकाता दौर्यात दगडांनी हल्ला करण्यात आला. यावरून भाजपाने मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या सरकारवर आरोप केला आहे. तसेच, राज्यात राष्ट्रपती शासन लागू करण्याची मागणी केली आहे. दरम्यान, जेपी नड्डा यांच्या ताफ्यावर झालेल्या हल्ल्याची चौकशी करण्याचे आदेश केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिले आहेत. याप्रकरणी गृहमंत्रालयाने राज्यपाल जगदीप धनखड यांच्याकडे पश्चिम बंगालची सद्यस्थिती व कायदा व सुव्यवस्थेविषयी सविस्तर अहवाल मागविला आहे.
कोलकाताजवळील दक्षिण २४ परगण्यात जेपी नड्डा यांच्यासह भाजपाचे नेते डायमंड हार्बरला जात असताना दुपारी बाराच्या वाजेच्या सुमारास त्यांच्या ताफ्यावर हल्ला करण्यात आला. टीएमसीच्या कार्यकर्त्यांनी भाजपाचे अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या ताफ्यास थांबविण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप भाजपा प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष यांनी केला. यावेळी टीएमसी कार्यकर्त्यांनी दगडफेकही केली, असे ते म्हणाले. दरम्यान, घटनेनंतर केंद्राने हे कठोर पाऊल उचलले आहे. याप्रकरणी राज्यपालांसमवेत डीजीपी आणि मुख्य सचिवांकडूनही अहवाल मागविण्यात आला आहे, असे सुत्रांकडून समजते.
दुसरीकडे, जेपी नड्डा यांच्या ताफ्यावर झालेल्या हल्ल्यावर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. 'या पुरस्कृत हिंसाचारावर बंगाल सरकारला जनतेला उत्तर द्यावं लागेल. आज बंगालमध्ये भाजपा अध्यक्ष जेपी नड्डांवर झालेला हल्ला हा अत्यंत निषेधार्ह आहे. याचा कितीही निषेध केला तरी तो कमीच आहे. केंद्र सरकार हा हल्ला अत्यंत गांभीर्याने घेत आहे. या पुरस्कृत हिंसेसाठी बंगाल सरकारला राज्यातील शांतताप्रिय जनतेला उत्तर द्यावे लागेल, असे सांगत अमित शहा यांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जींना इशारा दिला आहे.
'सभेसाठी पोहोचलो ते दुर्गामातेच्या कृपेमुळे'मी आज इथे सभेसाठी पोहोचलो ते दुर्गामातेच्या कृपेमुळे, असे जेपी नड्डा म्हणाले. तसेच, माध्यमांच्या वाहनांवरही दगडफेकही करण्यात आली. या हल्ल्यात कैलास विजयवर्गीय आणि मुकुल रॉयही जखमी झाले आहेत.ही घटना लोकशाहीला लाजवणारी आहे. या हल्ल्यातून ताफ्यातील एकही कार वाचू शकली नाही. बुलेट प्रूफ गाडी असल्याने आपण सुखरुप बचावलो, असे जेपी नड्डा म्हणाले.