मुंबई : पूर्वी व्हिसा मिळविणे अत्यंत जिकिरीची प्रक्रिया होती. मात्र, आता ऑनलाइन अर्ज मागवून कागदपत्रांची पूर्तता झाल्यावर घरपोच व्हिसा देण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. त्यामुळे अर्ज करणाऱ्यांच्या संख्येत २०१८ मध्ये गतवर्षीच्या तुलनेत तब्बल १४४ टक्क्यांची वाढ झाली आहे. यामध्ये केवळ महानगरांचा समावेश नसून, अलाहाबाद, अमरावती, त्रिवेंदम, सूरत, वाराणसी, गोरखपूर, मुझफ्फरपूर, इंदूर, गुवाहाटी, जोधपूर अशा शहरांमधूनही मोठ्या प्रमाणात अर्ज केले जात आहेत. देशात सर्वात जास्त अर्ज नागपूरमधून आले. त्या खालोखाल इंदूरने स्थान पटकावले. शिलाँगमध्ये २०१७ मध्ये केवळ २ अर्ज आले होते. २०१८ मध्ये ही संख्या १५० वर गेली. २०१६ पासून ही सेवा देशात उपलब्ध आहे.नुकत्याच जाहीर झालेल्या एका अहवालानुसार २०२० पर्यंत पाच कोटी भारतीय परदेशात प्रवास करतील. वेतनातील वाढ, कमी दरातील विमान तिकिटांची उपलब्धता व सहजपणे उपलब्ध असलेली व्हिसा, यामुळे या प्रवाशांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.परदेशात जाण्यासाठी व्हिसा मिळविणे अत्यावश्यक असल्याने व त्यामध्ये अनेक किचकट प्रक्रियांचा समावेश असल्याने अनेकदा अर्जदारांची व्हिसा मिळविण्यासाठी फसवणूक झाल्याचे प्रकारदेखील मोठ्या प्रमाणात घडतात. नोकरी मिळविण्यासाठी धडपडत असलेल्या तरुणांची अशा प्रकरणात फसवणूक झाल्याची सर्वात अधिक प्रकरणे घडली आहेत. ऑस्ट्रेलिया, कॅनडा व युके या देशांसोबत असे प्रकार घडल्याची सर्वात अधिक प्रकरणे नोंदविण्यात आली आहेत. २०१७च्या तुलनेत २०१८ मध्ये व्हिसाबाबत फसवणूक झालेल्यांची संख्या ३२ टक्क्यांनी घटली आहे. फसवणूक झालेल्यांमध्ये सर्वात अधिक संख्या दक्षिण आशियातील नागरिकांची (प्रामुख्याने भारतीयांची) आहे. बनावट ईमेल आयडी वरून नोकरीचा मेल येणे, ज्या कंपनीत नोकरीसाठी अर्ज केलेला नाही, त्या कंपनीकडून नोकरीचा मेल येणे, व्हिसाची मुदत समाप्त होण्यापूर्वी अर्जदाराकडून खासगी खात्यामध्ये पैशांची मागणी करणे, अशा पद्धतींचा यामध्ये प्रामुख्याने वापर केला जातो, त्यामुळे अशा प्रकारांपासून सावध राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.छोट्या परदेश सहलींच्या मानसिकतेत वाढवर्षात एका मोठ्या सहलीसाठी जाण्याऐवजी दोन ते तीन छोट्या सहलींसाठी जाण्याची मानसिकता आता भारतीयांची तयार झाली आहे. ऑस्ट्रेलिया, बेल्जियम, झेक रिपब्लिक, डेन्मार्क, इस्टोनिया, हंगेरी, फ्रान्स, माल्टा, पोर्तुगाल, जर्मनी, स्विर्त्झलंड अशा विविध देशांच्या व्हिसासाठी सध्या ही सेवा उपलब्ध आहे, अशी माहिती व्हीएफएस ग्लोबलतर्फे देण्यात आली.
घरपोच व्हिसा सेवेत १४४ टक्के वाढ
By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2019 4:42 AM