नवी दिल्ली : पतीच्या कार्यालयीन कामापेक्षा गृहिणीचे काम कोणत्याही प्रकारे कमी नाही, असा निर्वाळा सर्वोच्च न्यायालयाने एका प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान दिला आहे. दिल्लीतील एका अपघाताच्या प्रकरणाची सुनावणी करताना एका दाम्पत्याच्या नातेवाइकांना देण्यात येणारी नुकसान भरपाई वाढवून देण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले.
एप्रिल २०१९ मध्ये दिल्लीत एका कारच्या धडकेत दुचाकीस्वार एका जोडप्याचा मृत्यू झाला होता. न्यायमूर्ती एनव्ही रमण्णा आणि न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या खंडपीठाने हे निर्देश दिले आहेत. त्यामुळे दाम्पत्यांच्या नातेवाइकांना मिळणाऱ्या नुकसान भरपाईची रक्कम आता ११.२० लाख रुपयांवरून ३३.२० लाख रुपये झाली आहे. मे २०१४ पासून ९ टक्के वार्षिक व्याजदराने संबंधित इन्शुरन्स कंपनीने ही रक्कम द्यायची आहे, असे निर्देश न्यायालयाकडून देण्यात आले आहेत.
न्यायमूर्ती रमण्णा यांनी या प्रकरणाचा निकाल देताना, सन २००१ मधील लता वाधवा निकालाचा हवाला दिला आहे. या प्रकरणात महिला घरी करत असलेल्या कामाला आधार मानून निकाल देण्यात आला होता. या महिलेचा एका समारंभात झालेल्या अग्नितांडवात मृत्यू झाला होता. त्यामुळे तिच्या नातेवाइकांना नुकसान भरपाई देण्यात आली होती.
राष्ट्रीय अहवालाचा हवाला
या प्रकरणाच्या सुनावणीवेळी न्यायालयाकडून सन २०११ च्या जनगणनेनुसार जवळपास १५ कोटी ९० लाख ८५ हजार महिला गृहिणी असल्याचे समोर आले आहे. त्या तुलनेत केवळ ५७ लाख पुरुष घरगुती कामकाज करतात. भारतातील वेळेचे नियोजन या २०१९ मध्ये राष्ट्रीय सांख्यिकी विभागाने केलेल्या सर्वेक्षणाचा हवाला देण्यात आला आहे. त्यानुसार महिलावर्ग दिवसाची सरासरी २९९ मिनिटे (अंदाजे पाच तास) विनामानधन घरगुती कामकाजावर व्यतीत करतात. तर पुरुष केवळ ९७ मिनिटे (सुमारे एक तास ३७ मिनिटे) घरगुती कामकाजात घालवतात. एकंदरीत विचार करता, महिला दिवसातील सरासरी १६.९ टक्के विनामानधन घरगुती कामांमध्ये घालवतात. तर पुरुष केवळ आपला २.६ टक्के वेळ देतात, याकडे न्यायालयाने यांनी लक्ष वेधले.