नवी दिल्ली : शाळेचा गृहपाठ करत नाही म्हणून एका आईने अवघ्या ५ वर्षांच्या चिमुकलीला हातपाय बांधून रणरणत्या उन्हात छतावर झोपवल्याची संतापजनक घटना राजधानी दिल्लीत घडली. बुधवारी चिमुकलीचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियात खळबळ उडाली. दिल्ली पोलिसांनी चिमुकलीच्या आईविरोधात एफआयआर दाखल केला आहे.
शाळेचा गृहपाठ पूर्ण न केल्यामुळे आईने चिमुकलीला इतकी कठोर शिक्षा केल्याचे तपासात समोर आले. ही मुलगी इयत्ता पहिलीची विद्यार्थिनी आहे. आईचे नाव सपना, तर वडिलांचे नाव राज कुमार असे आहे. २ जून रोजी ही घटना घडली. हा व्हिडीओ खजुरी खास परिसरातील तुकमीरपूर गल्ली क्रमांक-२ चा असल्याचे निष्पन्न झाले. गृहपाठ पूर्ण न केल्याने मुलीला पाच ते सात मिनिटे शिक्षा केली होती. त्यानंतर मुलीला खाली आणले असे सपनाने पोलिसांना सांगितले. सपनाविरुद्ध एफआयआर नोंदवण्यात आला आहे.
संतापजनक व्हिडीओ दुपारी कडक उन्हात गच्ची पूर्ण तापलेली असल्यामुळे मुलीच्या शरीराला चटके बसत होते. त्यामुळे ती वेदनेने विव्हळत आई-आई ओरडत होती, पण निर्दयी आईला मुलीची दया आली नाही.
- असह्य चटके बसत असल्याने चिमुकली स्वतःला सोडवण्याचा प्रयत्न करत होती, पण हातपाय दोरीने बांधल्यामुळे तिला काहीही करता येत नव्हते. - परिसरातील कोणीतरी तोपर्यंत मुलीचा रडण्याचा आवाज ऐकून दुसऱ्या छतावरून व्हिडीओ रेकॉर्ड केला आणि बुधवारी तो व्हायरल झाला.