नवी दिल्ली: समलैंगिकता हिंदुत्वविरोधी असल्याचं भाजपाचे ज्येष्ठ नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी म्हटलं आहे. समलैंगिकता अपराध मानणाऱ्या आयपीसी 377 कलमाला घटनाबाह्य ठरवण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. समलैंगिकता अनैसर्गिक असून हा आजार दूर व्हावा, यासाठी वैद्यकीय क्षेत्रात संशोधन करण्याची गरज असल्याचं स्वामी म्हणाले. कलम 377 ला आव्हान देणाऱ्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. या कलमामुळे समलैंगिकता गुन्हा ठरतो. यावर भाष्य करताना समलैंगिकता हिंदुत्वविरोधी असल्याचं सुब्रमण्यम स्वामी यांनी म्हटलं. 'समलैंगिकता दूर व्हावी, यासाठी संधोधन करण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे भारतानं वैद्यकीय संशोधनावर मोठी गुंतवणूक करायला हवी,' असं ते म्हणाले. समलैंगिकता सामान्य नसल्याचंही त्यांनी पुढे म्हटलं. 'समलैंगिकता सामान्य नाही. ती हिंदुत्वविरोधी आहे. ती दूर व्हावी, यासाठी आपण वैद्यकीय संशोधन करायला हवं. त्यासाठी वैद्यकीय क्षेत्रात मोठी गुंतवणूक करायला हवी,' असं स्वामी यांनी एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना म्हटलं. आज पाच न्यायाधीशांचा समावेश असलेल्या खंडपीठासमोर यावर सुनावणी होत आहे. यामध्ये सरन्यायाधीश दीपक मिश्रा, न्यायाधीश आर. एफ. नरीमन, ए. एम. खानविलकर, डी. वाय. चंद्रचूड आणि इंदू मल्होत्रा यांचा समावेश आहे.
समलैंगिकता हिंदुत्वविरोधी- सुब्रमण्यम स्वामी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2018 1:16 PM