ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १८ - समलैंगिक संबंधांच्या विषयावर संघ परिवाराने त्यांच्या पारंपारिक विचारसरणीला छेद देणारी भूमिका मांडली आहे. संघ परिवाराने समलैंगिक संबंधांना गुन्ह्याच्या कक्षेतून वगळण्याचे समर्थन केले आहे.
गुरुवारी इंडिया टुडेच्या परिसंवादात याविषयावर आरएसएसचे सहसरचिटणीस दत्तात्रय होसांबळे यांनी मत व्यक्त केले. समलैंगिकतेवर आरएसएसने भूमिका का मांडावी? दुस-याच्या आयुष्यावर परिणाम होत नसेल तो पर्यंत समलैंगिक संबंध गुन्हा ठरत नाही. लैंगिक पसंती हा प्रत्येकाचा खासगी विषय आहे असे दत्तात्रय होसांबळे यांनी सांगितले.
भाजपचे वैचारीक मार्गदर्शक असलेल्या आरएसएसने समलैंगिक संबंधांचे जाहीर समर्थन केल्यामुळे भाजपकडून समलैंगिक संबंधांना गुन्हा ठरवणारे कलम ३७७ रद्द करण्यासाठी पावले उचलली जातील अशी अपेक्षा निर्माण झाली आहे.
चालू अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या टप्प्यात काँग्रेस खासदार शशी थरुर यांनी समलैंगिकतेला गुन्हेगारीच्या कक्षेतून वगळावे यासाठी सादर केलेले विधेयक नामंजूर झाले होते. भाजपमध्ये काही जण समलैंगिक संबंधांना मान्यता देण्याच्या बाजूने आहेत. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनीही समलैंगिक संबंधांना गुन्ह्याच्या कक्षेतून वगळण्याचे समर्थन केले आहे. याविषयावर सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालावर केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी नापसंती व्यक्त केली होती.