ओडिशा राज्यातील बरहमपूरमध्ये एका ऑटो चालकाने प्रामाणिकपणाचा आदर्श निर्माण केला आहे. सद्यस्थितीत रस्त्यावर पडलेला ५ रुपयांचा ठोकला काही वेळात गायब झालेला असतो. मात्र, सोन्याच्या दागिन्यांनी भरलेली बॅग या रिक्षावाल्याने प्रवाशाला घरी जाऊन परत केली. इमानदारी हाच खरा दागिना असल्याचं या रिक्षावाल्याने आपल्या कृतीतून दाखवून दिलं. ऑटो चालकाचा हा प्रामाणिकपणा पाहून प्रवासी कुटुंबही गहिवरल्याचं पाहायला मिळालं.
बरहमपूरमधील या रिक्षाचालकाचं मोठं कौतुक होत असून अनेकांनी सोशल मीडियातून त्याच्या प्रामाणिकपणाची स्टोरी शेअर केलीय. येथील प्रवासात एका कुटुंबाने आपली सोन्याच्या दागिन्यांची बॅग चुकून रिक्षातच ठेवली. सीमांचल येथील कुटुंबीय एका कार्यक्रमासाठी बहरमपूर येथे आले होते. बरहमपूर येथे पोहोचल्यानंतर ओम बिहार जाण्यासाठी या कुटुंबाने टी. सीमाद्री यांची रिक्षा बुक केली. आपल्या इच्छित स्थळी पोहोचल्यानंतर प्रवासी निघून गेले. मात्र, त्यांची एक बॅग रिक्षातच राहिली होती.
रिक्षाचालक सीमाद्री यांनी जेव्हा ही बॅग पाहिली, तेव्हा या बॅगेत सोन्याच्या दागिन्यांसह काही महत्त्वाचे दस्तावेजही होते. या दस्तावेजवर रिक्षातील प्रवाशांचे नाव आणि रहिवाशी पत्ताही लिहिण्यात आला होता. त्यामुळे, ऑटोचालकाने तात्काळ त्या पत्त्यावर जायचं ठरवलं. प्रवाशांच्या घरी पोहोचून त्यांनी ती बॅग ज्यांची होती, त्यांच्याकडे परत केली. त्यावेळी, प्रवाशांचे नातेवाईक असलेल्या एम. चाकडोला यांनी रिक्षाचालक सीमाद्री यांचे आभार मानले. तसेच, आपण प्रामाणिकपणाचा आदर्श निर्माण केल्याचंही म्हटलं. यावेळी, इमान सबसे बडा होता है, असे सीमाद्री यांनी म्हटलं.