ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 2 - भाजपा खासदार के. सी. पटेल यांनी एका महिलेविरोधात हनी ट्रॅपमध्ये अडकवल्याची तक्रार दाखल केल्यानंतर सोमवारी दिल्ली पोलिसांनी त्या महिलेच्या घरावर छापा मारला. पण त्यावेळी ती महिला घरात सापडली नाही. महिलेने आपल्याकडून 5 कोटी रुपयांची मागणी केली असा आरोप पटेल यांनी केला आहे. के.सी.पटेल हे गुजरातच्या वलसाड लोकसभा मतदारसंघातून खासदार आहेत.
दरम्यान संबंधित महिलेने खासदार पटेल यांच्यावरच बलात्काराचा गंभीर आरोप केला आहे. पेशानं वकील असलेल्या महिलेनं सांगितलं की, खासदार के. सी. पटेल यांचा एक खटला सर्वोच्च न्यायालयात सुरू होता. त्याच दरम्यान माझी के. सी. पटेल यांच्याशी ओळख झाली. त्यानंतर त्यांनी खटल्यासंदर्भात चर्चा करण्यासाठी मला स्वतःच्या नर्मदा अपार्टमेंट, 604 नंबरच्या फ्लॅटवर बोलावलं. त्यावेळी त्यांनी माझ्यावर बलात्कारही केला आणि तोंड उघडल्यास ठार मारण्याची धमकी दिल्याचा गौप्यस्फोट या महिलेनं केला आहे.
महिला म्हणाली, के. सी. पटेल डिनरच्या निमित्तानं गाझियाबादमधील माझ्या घरीसुद्धा आले होते. त्यावेळीही त्यांनी माझ्यासोबत जोरजबरदस्तीनं बलात्कार केला असे या महिलेने म्हटले आहे. पटेल यांनी माझ्यावर अनेकदा बलात्कार केला. त्यांच्या धमक्यांपासून सुटका करुन घेण्यासाठी पुरावा म्हणून मला सीडी बनवावी लागली असे या महिलेने म्हटले आहे.
खासदार पटेल आणि दिल्ली पोलिसांनी महिलेचे आरोप फेटाळून लावले आहेत. सदर महिलेने यापूर्वी हरयाणातील एका खासदाराविरोधात तिलक मार्ग पोलिस स्थानकात बलात्काराची तक्रार दाखल केली होती. पण नंतर तिने तक्रार मागे घेतली अशी माहिती दिल्लीचे पोलीस आयुक्त मुकेश मीणा यांनी दिली. पोलिसांनी तपास सुरु केल्यानंतर महिलेने तिची तक्रार मागे घेतली. आम्ही या प्रकरणाचा सर्व बाजूने तपास करत आहोत असे त्यांनी सांगितले.
हा खंडणीचा प्रकार असून बलात्काराचा गुन्हा दाखल झालेला नाही असे त्यांनी सांगितले. पोलीस सध्या या महिलेच्या मोबाईलचे डिटेल्स तपासत आहेत. मला या प्रकरणात गोवण्यात आले असून, मी निर्दोष आहे. मी चौकशीत सर्व आवश्यक सहकार्य करीने असे पटेल यांनी सांगितले.