पंचकुला- डेरा सच्चा सौदाचा प्रमुख आणि बलात्कार प्रकरणी तुरूंगात शिक्षा भोगत असलेल्या राम रहीमची दत्तक मुलगी हनीप्रीतला बुधवारी सकाळी पंचकुला कोर्टात हजर करण्यात आलं. कडक सुरक्षा व्यवस्थेमध्ये हनीप्रीतला कोर्टात आणण्यात आलं. कोर्टात हजर केल्यावर सुनावणी दरम्यान हनीप्रीत भावूक झाली. कोर्टात ती हात जोडून रडायला लागल्याचं समजतं आहे. कोर्टात हनीप्रीतने आपण निर्दोष असल्याचं सांगितलं.
पोलिसांनी हनीप्रीतच्या 14 दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी केली होती. पण हनीप्रीतला सहा दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे. पोलिसांनी हनीप्रीतच्या मोबाइलचीही मागणी केली. पोलिसांच्या मते सिरसामधील हिंसाचाऱ्याच्या वेळी हनीप्रीत मोबाइल वापरत होती. त्यावेळी वापरलेला मोबाइल पोलिसांना हवा आहे. तसंच फरार असताना हनीप्रीत तिच्या मोबाइल वरून काही लोकांच्या संपर्कात होती.
बलात्कार प्रकरणात राम रहीमला कोर्टाने दोषी ठरविल्यावर हरियाणा, पंजाब आणि दिल्लीमध्ये मोठ्या प्रमाणात हिंसाचार उसळला होता. हा हिंसाचार घडवून आणण्यामागे हनीप्रीतचा हात होता, असं बोललं जातं. या हिंसाचारात 38 लोकांचा मृत्यू झाला तर 364 जण जखमी झाले. हिंसाचाऱ्याच्या घटनेनंतर हनीप्रीत फरार झाली होती. तब्बल 38 दिवसांनंतर हनीप्रीत पोलिसांना सापडली. माध्यमांसमोर येऊन मुलाखत दिल्यानंतर पोलिसांनी मंगळवारी तिला अटक केली. सुत्रांच्या माहितीनुसार पंजाबच्या भटिंडामधील एका डेरा समर्थकाच्या घरात हनीप्रीत लपली होती. फरार झाल्यापासून हनीप्रीतने कोणा-कोणाशी संपर्क साधला? याचा तपास पोलीस करत आहेत.
पोलिसांच्या आधी मीडियाला सापडणारी हनीप्रीत 38 दिवसांपासून लपली होती 'या' ठिकाणी
बलात्कार प्रकरणी तुरूंगात शिक्षा भोगत असलेल्या राम रहीमची दत्तक कन्या हनीप्रीतचा हरियाणा पोलीस दिवस-रात्र शोध घेत होते. नेपाळसह देशाच्या अनेक राज्यांमध्ये पोलिसांनी छापे मापले पण कुठेही हनीप्रीत सापडली नाही. सगळीकडून वाढणाऱ्या दबावामुळे शेवटी हनीप्रीत माध्यमांसमोर आली आणि हरियाणा पोलिसांनी तिला अटक केली. पोलिसांच्या चौकशीत हनीप्रीतने दावा केला आहे की, ती नेपाळला गेली नव्हती. पंजाबच्या भटिंडामधील एका डेरा समर्थकाच्या घरात मी लपली होती.