नवी दिल्ली- बलात्कार प्रकरणी तुरूंगात शिक्षा भोगत असलेल्या राम रहीमची दत्तक मुलगी हनीप्रीतचा पोलिसांकडून देशभर शोध घेतला जातो आहे. हनीप्रीत नेपाळमध्ये लपली असल्याची माहिती समोर आली होती, त्यानंतर इंटरनॅशनल अलर्ट जारी करण्यात आला होता. आता हनीप्रीत दिल्लीमध्ये असल्याची माहिती समोर आली आहे. सोमवारी हनीप्रीतने तिच्या वकिलांमार्फत दिल्ली हायकोर्टात अटकपूर्व जामिनासाठी याचिका दाखल केली आहे. या अटकपूर्व जामीन अर्जावर दुपारी दोन वाजता सुनावणी होणार आहे. हनीप्रीत सोमवारी अटकपूर्व जामीन अर्जाच्या याचिकेवर सही करण्यासाठी माझ्या ऑफिसमध्ये आल्याचं हनीप्रीतचे वकील प्रदीप आर्य यांनी सांगितलं आहे.
हनीप्रीतचे वकील प्रदीप कुमार आर्य यांनी दिल्ली हाय कोर्टाच्या समोर तीन आठवड्यांसाठी हनीप्रीतला ट्रांजिट बेल मिळविण्याची मागणी केली आहे. मुख्य न्यायमूर्ती गीता मित्तल यांनी हलक्या स्वरात हनीप्रीत कुठे असल्याची वकिलांकडे विचारणा केली होती. त्याचं उत्तर देताना हनीप्रीतच्या जीवाला धोका असल्याचं तिच्या वकिलांनी कोर्टाला सांगितलं. हरियाणा पोलिसांनीही हनीप्रीतच्या जीवाला धोका असल्याची शक्यता वर्तविली आहे. हनीप्रीतकडून दाखल झालेल्या याचिकेत तिच्या जीवाला पंजाब आणि हरियाणातील ड्रग्ज माफियांकडून धोका असल्याचं सांगण्यात आलं आहे. मी एक साफ आणि साधं आयुष्य जगणारी महिला असल्याचं हनीप्रीतने याचिकेत म्हंटलं आहे. मी कायद्याचं पालन करणारी असून पोलीस तपासाला सहकार्य करण्यासाठी तयार असल्याचं याचिकेत नमूद असल्याचं समजतं आहे. या याचिकेवर दुपारी दोन वाजता सुनावणी केली जाणार असल्याचं मुख्य न्यायमुर्तींनी सांगितलं आहे. याच दरम्यान हरियाणा पोलिसांनी अरेस्ट वॉरंटसह दिल्लीच्या ग्रेटर कैलाशमधील एका घरावर छापा मारला पण तिथे हनीप्रीत सापडली नाही.
राम रहीमला कोर्टाने दोषी ठरविल्यानंतर 25 ऑगस्टपासून हनीप्रीत फरार आहे. कोर्टात तिने हनीप्रीत तनेजी नावाने याचिका दाखल केली आहे. हनीप्रीत सतत माझ्या संपर्कात आहे. तिला योग्य निर्णय घ्यायला वेळ लागला. तिने माझ्याशी संपर्क केल्यावर आम्ही लगेचच महत्त्वाची पाऊलं उचलली असल्याचं हनीप्रीतच्या वकिलांनी सांगितलं. याचिकेच्या कागदपत्रांवर सही करण्यासाठी हनीप्रीत सोमवारी दुपारी दिल्लीतील लाजपत नगरमधील माझ्या ऑफिसला आली होती, असंही त्यांनी सांगितलं. हनीप्रीत आता कुठे आहे ? अशी विचारणा कोर्टाने केल्यावर त्याबद्दल आपल्याला अधिक माहिती नसल्याचं वकिलांनी सांगितलं आहे.