बांगलादेशमधील खासदार अनवारूल अझीम अनार यांची पश्चिम बंगालमधील कोलकाता येथे हत्या झाल्याने खळबळ उडाली होती. दरम्यान, पश्चिम बंगाल सीआयडीच्या तपास अधिकाऱ्यांनी बांगलादेशी खासदारांच्या हत्येचा कट हा चार ते पाच महिन्यांपूर्वी रचण्यात आला. तसेच या कटाची सुरुवात एका तरुणी्च्या फोन कॉलच्या माध्यमातून झाली होती, असा दावा केला आहे. ही तरुणी बांगलादेशमधील खासदार अझीम अनार यांना तिच्या मधाळ आवाजामध्ये फ्लॅटमध्ये बोलावते. त्यानंतर हे खासदार महोदय या तरुणीच्या जाळ्यात असे अकडले की ते ढाका येथून थेट कोलकाता येथे आले. मात्र तिथे या सुंदर महिलेसोबत आणखी एक कसाईही तिथे उपस्थित होती. त्या कसायाने बांगलादेशी खासदारांची हत्या करून त्यांच्या मृतदेहाचे तुकडे केले.
बांगलादेशमधील खासदार अझीम अनार हे १२ मे रोजी उपाचारांसाठी कोलकाता येथे आले होते. येथे ते बारानगरमधील आपले मित्र गोपाल बिस्वास यांच्या घरी थांबले होते. त्यानंतर १४ मे रोजी ते मी डॉक्टरांना भेटून संध्याकाळी परत येतो, असं सांगून घराबाहेर पडले. त्यानंतर संध्याकाळी आपण दिल्लीला जात असल्याचे त्यांनी गोपाल बिस्वास यांना व्हॉट्सअॅपवर मेसेज करून कळवले. मात्र नंतर ते बेपत्ता झाले.
दरम्यान, अनवारूल अझीम अनार यांच्या हत्येमागे सोन्याच्या तस्करीचा वाद असल्याचे सांगितले जात आहे. बांगलादेश पोलिसांच्या डिटेक्टिव्ह ब्रँचने दिलेल्या माहितीनुसार अनवारूल अझीम अनार यांच्या हत्येचा मास्टर माईंड अख्तरुज्जमां शाहीन आहे. अख्तरुज्जमां शाहीन हा बांगलादेशी वंशाचा अमेरिकन नागरिक आहे आणि सोन्याची तस्करी करण्याचं काम करतो. अख्तरुज्जमां शाहीन हा अमेरिकेत गेला. मात्र त्याचं भारत आणि बांगलादेशमध्ये येणं जाणं सुरू होतं. याचदरम्यान तो बेकायदेशीर धंद्यांशी जोडला गेला.
पश्चिम बंगाल सीआयडीच्या एका अधिकाऱ्याने दावा केला की, ढाका येथे एका कसायाला या कटामध्ये सहभागी करून घेण्यापासून ते खासदाराला हनिट्रॅपमध्ये अडकवण्यापर्यंत आणि उपचारांच्या नावाखाली त्यांना कोलकात्यात आणण्यापर्यंतचं छडयंत्र जानेवारी महिन्यामध्ये बांगलादेशची राजधानी ढाका येथे रचण्यात आलं होतं. त्यांनी दावा केला की, अनार यांचा मित्र नसलेला अमेरिकन नागरिक असलेला शाहीन अनेकदा ढाकामध्ये गेला होता. त्याने खासदारांची हत्या करण्यासाठी आपल्या सहकाऱ्यांच्या संपर्कात राहण्यासाठी फेसटाइम आमि टेलिग्राम मेसेंजर सारख्या माध्यमांचा वापर केला. तसेच हत्या घडवून आणण्यासाठी एका कसायाला अवैधपणे भारतात आण्यात आले होते, असेही या अधिकाऱ्यांनी सांगितले.