- स्पॉट बॉय
हरिकिशन गोस्वामी तथा मनोजकुमार यांना चित्रपटसृष्टीतील सर्वोच्च असा दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर होणे हा देशप्रेमाच्या दीर्घ यात्रेचा सन्मान म्हणावा लागेल. भारतकुमार अशी या नटाची प्रतिमा सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रत अगदी सहज प्रचलित झाली. पण या माणसाचा एक गुण तसा दुर्लक्षित राहिला. गाण्याचे अप्रतिम चित्रीकरण करण्याची त्याची हातोटी म्हणावी तशी चर्चिली गेली नाही. उपकार सिनेमापासून तो दिग्दर्शनात उतरला आणि भारतकुमार ही उपाधी त्याच्या नावाला कायमची लागली. उपकार, शोर, रोटी कपडा और मकान आणि पूरब और पश्चिम तसेच क्रांती या चित्रपटांमध्ये गाण्याच्या पडद्यावरील सादरीकरणातील हातखंडा दिग्दर्शक मनोजकुमारने ठळकपणो अधोरेखित केला. गाण्याच्या पडद्यावरील सादरीकरणाची त्याची ही शैली राजकपूर, गुरूदत्त, विजय आनंद, राज खोसला आणि अलिकडच्या काळातील सुभाष घई यांच्या वैशिष्टय़ाच्या जवळ जाणारी होती. मनोजकुमारच्या कोणत्याही चित्रपटातील गाण्याचे बोल ऐकले की सिनेमातला तो दृश्य प्रसंग डोळय़ांपुढे उभा राहतो. पण हा मोठा गुण भारतकुमार ही प्रतिमा आणि त्याच्या अभिनयावर असलेल्या दिलीपकुमारच्या प्रभावाची चर्चा यामुळे झाकोळला गेला.
गाण्यातून पडकथा पुढे नेण्याचे मनोजकुमारचे कसब जिंदगी की ना टूटे लडी, हाय हाय ये मजबूरी अशा अनेक गाण्यांमधून लख्ख डोकावते. पण त्याचा दिग्दर्शनीय प्रभाव नंतर बोथट कसा झाला हे नुसलेले कोडे आहे. जहीन नावाच्या सिनेमामध्ये मनीषा कोईरालाने चित्रीकरणाच्या काळात मनोजकुमारची अक्षरश: दमछाक केली. हा नव्या युगाचा बदलता संदेश असल्याचे मानून मनोजकुमारने दिग्दर्शनाचा नाद त्यानंतर सोडून दिला.
मनोजकुमारचे चित्रपट देशभक्ती जागृत करतात असे सर्वसामान्यांचे ठाम मत आहे. त्याचवेळी त्याच्या सिनेमात अतिरंजन, हास्यास्पद मसाला आणि बिनडोक तडजोडींचा संगम असतो, असे समकालीन समीक्षक म्हणत आले. 1960च्या अखेरीचा आणि 70 च्या पूर्ण दशकातला प्रेक्षक या फिल्मी देशभक्तीने सतत जोडला गेला. उपकार ते क्रांती या प्रवासातील त्याच्या प्रत्येक सिनेमाने सिल्व्हर किंवा गोल्डन ज्युबिली साजरी केली.
तसे पाहिले तर मनोजकुमार हा दिलीपकुमारचा निस्सिम चाहता. हे त्याने कधी लपविले नाही. फॅशन चित्रपटापासून कारकीर्द सुरू केलेल्या मनोजकुमारने दिलीपकुमारची सर्रास नक्कल ही टीका झेलत यशाचं प्रगती पुस्तक चढत्या भाजणीचं ठेवलं. हिमालय की गोद में, गुमनाम, हरियाली और रास्ता, सावन की घटा अशा त्याच्या चित्रपटात दिलीपकुमारचा प्रभाव जाणवला पण प्रेक्षकांनी तो विनातक्रार स्वीकारला. गंमत म्हणजे अगदी सुरूवातीच्या टप्प्यात मनोजकुमारला आदमी सिनेमाच्या निमित्ताने दिलीपकुमारसोबत काम करायची संधी मिळाली. त्याच मनोजकुमारनं पुढे क्रांती सिनेमात दिलीपकुमारला दिग्दर्शन दिले.
स्वत:च्या अभिनयाच्या मर्यादा ठाऊक असल्याने त्याने आपल्या चित्रपटांची संख्या मर्यादित ठेवली. ही व्यावहारिक हुशारी होती. त्याने कायम लॅण्डलाईन फोन वापरण्याचे वैशिष्टय़े जपले. बहुतेक वेळा तो स्वत:च फोन अॅटेण्ड करायचा. हा सुखद अनुभव अनेक चित्रपट समीक्षकांनी घेतला आहे. जुहुच्या जयहिंद सोसायटीतल्या घरी आलेल्याचे स्वागत करण्यातला त्याचा उत्साह नेहमीच दांडगा असायचा. जुन्या आठवणींचा कप्पा उगडून अनेक नट-नटय़ांची वैशिष्टय़े सांगण्यात रमणारा सद्गृहस्थ ही त्याची प्रतिमा अमीट आहे.
1980च्या दशकात मनोजकुमारची गणना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा खास मित्र म्हणून होत असे. त्या काळात मातोश्रीवर नियमित राबता असणा:यांमध्ये मनोजकुमारचेही नाव होते. अर्थात राजकीय विचारांच्या बाबतीत तो उजवा आहे की डावा हे कायम गुलदस्त्यातच राहिले. अर्थात राजकीय भेटींमधून प्रेरणा घेण्यात मनोजकुमारने कधी कमीपणा मानला नाही. लालबहादूर शास्त्रींसोबत झालेल्या भेटीत कृषीप्रधान भारताचे प्रतिबिंब सिनेमात पडण्याची गरज आणि अपेक्षा व्यक्त झाली. ती मनोजकुमारने उपकारच्या माध्यमातून पूर्ण केली. मनोजकुमारचे आणखी एक योगदान असे, की क्रूर खलनायक अशी प्रतिमा रूढ झालेल्या प्राणला उपकारमधील मंगलचाचाच्या भूमिकेतून त्याने चरित्र नायकाच्या पठडीत आणले. तर भाऊ राजीव गोस्वामीच्या पेंटर बाबू सिनेमातून मीनाक्षी शेषाद्रीला चित्रपट सृष्टीत आणले.
पूरब और पश्चिमच्या चित्रीकरणाच्या निमित्ताने तो लंडनला विमानाने गेला. पण भारतात मात्र त्याने कायम रेल्वेने प्रवास केला. दिल्ली फिल्म फेस्टिव्हलला जाणा:या सिनेजर्नालिस्टना अनेकदा राजधानी एक्स्प्रेसमध्ये मनोजकुमार सहप्रवाशाच्या रूपात भेटले आहेत.
अनेकानेक पुरस्कार, आघाडीच्या नायिकांसोबत भूमिका प्रभावी दिग्दर्शन आणि आम आदमीचे लाभलेले उदंड प्रेम अशा देशभक्तीभोवती लपेटलेल्या दीर्घ कारकिर्दीचा फाळके पुरस्काराने सन्मान होऊ घातला आहे.