नवी दिल्ली : इतरांच्या मतांचा आदर करुन संसदीय लोकशाहीची प्रतिष्ठा जपण्याची सूचना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी खासदारांना केली आहे. लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी खासदारांसाठी २३ जुलैै २०१५ पासून स्पीकर्स रिसर्च इनिशिएटिव्ह (एसआरआय) हा प्रकल्प सुरु केला होता. त्याच्या तिसऱ्या वर्धापनदिनानिमित्त आयोजिलेल्या कार्यक्रमात राष्ट्रपती बोलत होते.कोविंद पुढे म्हणाले की, संसदेच्या कामकाजाचे थेट प्रक्षेपण होत असते हे खासदारांनी लक्षात ठेवावे. जनतेचे प्रश्न तसेच देशाच्या विकासाच्या योजना यावर संसदेच्या सभागृहांमध्ये चर्चा व्हावी अशी जनतेची अपेक्षा असते. नागरिकांच्या इच्छा, आकांक्षा पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील असणे ही संसदेची जबाबदारी आहे.संसद व विधिमंडळामध्ये अनेक मुद्द्यांवर चर्चा व्हाव्या, त्यावर विचारमंथन करावे व मग त्यानंतर निर्णय घेतले जाणे अपेक्षित असते. मात्र चर्चा करताना आमदार, खासदारांनी सभागृहाचे पावित्र्य जपणे तितकेच आवश्यक आहे. त्यातून लोकशाही बळकट होते. एखाद्या मुद्द्याची संशोधनाद्वारे सखोल माहिती मिळवून मगच त्याबाबत निर्णय घेतला जावा. त्यादृष्टीने एसआरआय प्रकल्पाची खूप मोठी मदत होत आहे.
‘इतरांच्या मतांचा आदर करून संसदेची प्रतिष्ठा जपा’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2018 3:47 AM