नवी दिल्ली : वरिष्ठ विषाणूशास्त्रज्ञ डॉ. रमण गंगाखेडकर, समाजसेवक पोपटराव पवार, कृषी क्षेत्रात अतुलनीय काम करणाऱ्या राहीबाई पोपेरे यांच्यासह कला क्षेत्रातील सुरेश वाडेकर, कंगना रनौत, करण जोहर, एकता कपूर, आदींना सोमवारी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते पद्म पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. राष्ट्रपती भवनात हा पुरस्कार सोहळा पार पडला.
२०२० आणि २०२१ या दोन्ही वर्षांतील जाहीर झालेले पुरस्कार सोमवारी आणि मंगळवारी असे सलग दोन दिवस वितरित करण्यात येत आहेत. २०२० मध्ये ७ मान्यवरांना पद्मविभूषण, १६ मान्यवरांना पद्मभूषण आणि ११८ मान्यवरांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाले होते. यामध्ये महाराष्ट्रातील १३ मान्यवरांचा समावेश आहे. यात डॉ. रमण गंगाखेडकर यांना विज्ञान आणि अभियांत्रिकी क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. गंगाखेडकर हे वरिष्ठ विषाणूशास्त्रज्ञ आहेत. ते इंडियन काऊंसिल ऑफ मेडिकल अँड रिसर्च या संस्थेच्या साथी आणि संसर्गजन्य रोग विभागाचे प्रमुख होते.
सरिता जोशी यांना हिंदी, मराठी, गुजरातीमध्ये अभिनय क्षेत्रातील योगदानासाठी पद्मश्री प्रदान करून गौरविण्यात आले. गेल्या ७ दशकांत त्यांनी दूरचित्रवाणी, नाटक आणि सिनेजगतात आपल्या कामाचा ठसा उमटविला आहे. कंगना रनौत यांना हिंदी सिनेसृष्टीतील योगदानासाठी पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. कंगनाला याआधी उत्कृष्ट अभिनयासाठी तीनवेळा राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराने गौरविण्यात आलेले आहे. सिनेक्षेत्रातील गायनासाठी अदनान सामी यांना पद्मश्री पुरस्काराने गौरविण्यात आले. सामी हे संगीतकारही आहेत. चित्रपट निर्मात्या एकता कपूर, करण जोहर यांना कला क्षेत्रातील, तर सुरेश वाडकर यांना कला/गायन विभागातील, राहीबाई पोपेरे यांना कृषी, तर समाजसेवेतील पद्म पुरस्काराने पोपटराव पवार यांना सन्मानित करण्यात आले.
यांना मरणोत्तर : पद्मविभूषण पुरस्काराने ज्यांना सन्मानित करण्यात आले, त्यात माजी केंद्रीय मंत्री जॉर्ज फर्नांडिस, अरुण जेटली, सुषमा स्वराज (सर्वांना मरणोत्तर) यांचा समावेश आहे.