लखनौ - आपला मुलगा आपल्यापेक्षा मोठा व्हावा हे प्रत्येक वडिलांचे स्वप्न असते. पण, जेव्हा आपलाच मुलगा आपला बॉस बनून समोर येईल, तो क्षण प्रत्येक बापाची छाती फुगवणारा ठरतो. लखनौ पोलीस दलातील जनार्दन सिंग यांच्याही आयुष्यात असाच एक अविस्मरणीय क्षण आला. कारण, जनार्दन यांचा मुलगा अनुप सिंग हे लखनौ उत्तर जिल्ह्याचे पोलीस अधिक्षक बनून वडिलांसमोर उभे ठाकले. आपलाच मुलगा आपला साहेब बनून आपल्याच पोलीस कार्यक्षेत्रात आल्यानंतर जनार्दनसिंग यांचा आनंद गगनात मावेना असाच झाला. अर्थात, लहानपणी ज्या मुलाला पाठीवर घेतले, तरुणपणी ज्या मुलाची कौतुकाने पाठ थोपटली त्याच मुलाला आता जनार्दन यांना सॅल्युट करावा लागणार आहे. मात्र, स्वत:च्या मुलाला सॅल्युट करणे हे कुठल्याही बापासाठी अभिमानास्पद असल्याचे जनार्दन यांनी म्हटले.
अनुप सिंग यांनी रविवारी उत्तर लखनौ जिल्ह्याच्या पोलीस अधिक्षकपदी पदभार स्विकारला. त्यावेळी जनार्दन यांनी पत्रकारांनी प्रश्न विचारला, त्यावर बोलताना जनादर्न यांनी आपल्या भावनिक स्वरात अभिमानाने उत्तर दिले. आज, माझा मुलगा माझा साहेब बनून आला याचा मला प्रचंड अभिमान आहे. तसेच हा माझाच सन्मान असल्याचे मी समजतो. विशेष म्हणजे मी माझ्या मुलाच्या अखत्यारीत चांगले कार्य करेल, असेही जनादर्न यांनी म्हटले. तसेच मी कर्तव्यावर असताना जेव्हाही माझ्या मुलासमोर येईल, तेव्हा प्रोटोकॉलप्रमाणे सर्वप्रथम त्यांना सॅल्युट करेल, असेही जनादर्न यांनी सांगितले. दरम्यान, अनुपसिंग यांची उन्नाव येथून उत्तर लखनौ येथे बदली करण्यात आली आहे. त्यावेळी, माझ्या वडिलांकडून मी खूप काही शकलो असून वडिलांच्या प्रेरणेतूनच मी पोलीस दलात काम करण्याचे ठरवल्याचेही अनुपसिंग यांनी म्हटले.