नवी दिल्ली - तेलुगू देसमच्या दोन मंत्र्यांनी मोदी सरकारचा राजीनामा दिल्याचे भाजपाला फारसे दु:ख दिसत नसून, ही इष्टापत्तीच वाटत आहे. आंध्र प्रदेशमध्ये पक्षाचा विस्तार करता येईल, असेच भाजपाला वाटत आहे.आंध्र प्रदेश भाजपाचे अध्यक्ष के. हरि बाबू म्हणाले की, तेलुगू देसम वेगळी वाट धरेल, हे ध्यानात आले होते. आम्ही स्वतंत्रपणे लढलो तर भाजपाच्या जागा वाढूही शकतील. निवडणुकांत दोघांनी मिळून लोकसभेच्या २५पैकी १७ जागा तर विधानसभेच्या १७५ जागांपैकी १०६ जागा जिंकल्या होत्या. लोकसभेत भाजपाला ७ तर विधानसभेत २ टक्के मते मिळाली होती.राजीनामे स्वीकारले : तेलुगू देसम पार्टीचे खासदार अशोक गजपती राजू व वाय. एस. चौधरी यांच्या मंत्रिपदाचे राजीनामे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी शुक्रवारी स्वीकारले. मोदी सरकारमध्ये राजू हे नागरी उड्डयन मंत्री तर, चौधरी हे विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाचे मंत्री होते. नागरी विमान मंत्रालयाचे काम पंतप्रधान पाहतील.मोदींच्या फोनमुळेच रालोआमध्ये टीडीपी- हरिश गुप्तानवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आंध्रचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांना फोन केल्याने तेलुगू देसमने रालोआतून बाहेर पडण्याचा निर्णय टाळला, असे समजते.तेलुगू देसमच्या दोन मंत्र्यांनी राजीनामा दिल्यानंतर राजीनामे मागे घ्यावेत, अशी विनंती मोदी यांनी नायडूंना केली. त्यावर आंध्र प्रदेशला विशेष राज्याचा दर्जा देण्यासंदर्भात तसेच जी इतर आश्वासने देण्यात आली ती पूर्ण होण्याची आम्ही चार वर्षे वाट पाहिली. पण त्या दिशेने काही न झाल्याने आता माझ्या पक्षाच्या मंत्र्यांनी राजीनामे दिले असून ते मागे घेता येणार नाहीत, असे नायडू म्हणाले. मात्र आंध्र प्रदेशसाठी काही पावले उचलण्याचे आश्वासन दिल्यानंतर चंद्राबाबू नायडू यांचा रालोआतून बाहेर पडण्याचा विचार बदलला. मंत्र्यांच्या राजीनाम्यापुरताच असंतोषाचा आवाका त्यांनी मर्यादित ठेवला.
भाजपाला आंध्रात विस्ताराची आशा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2018 1:48 AM