आशा सोडली नव्हती, सर्वांनी मनोधैर्य राखले, सुटकेनंतर कामगारांनी पंतप्रधान माेदींना सांगितले अनुभव

By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2023 07:20 AM2023-11-30T07:20:12+5:302023-11-30T07:21:19+5:30

Uttarkashi Tunnel Accident: ऐन दिवाळीच्या दिवशी आमच्यापुढे जणू मृत्यूच्या रूपातच बोगद्याचा भाग कोसळला आणि जगापासून आमचा संपर्क तुटला. १७ दिवसांपासून आमच्या सुटकेसाठी प्रयत्न सुरू असले, तरी आम्ही कधीही आशा सोडली नव्हती.

Hope was not lost, everyone kept their morale, the workers shared their experience with PM Modi after the release | आशा सोडली नव्हती, सर्वांनी मनोधैर्य राखले, सुटकेनंतर कामगारांनी पंतप्रधान माेदींना सांगितले अनुभव

आशा सोडली नव्हती, सर्वांनी मनोधैर्य राखले, सुटकेनंतर कामगारांनी पंतप्रधान माेदींना सांगितले अनुभव

उत्तरकाशी - ऐन दिवाळीच्या दिवशी आमच्यापुढे जणू मृत्यूच्या रूपातच बोगद्याचा भाग कोसळला आणि जगापासून आमचा संपर्क तुटला. १७ दिवसांपासून आमच्या सुटकेसाठी प्रयत्न सुरू असले, तरी आम्ही कधीही आशा सोडली नव्हती. परदेशात अडकलेल्या भारतीयांना सरकार सोडवू शकते, तर आम्हाला का नाही? हा विश्वास आम्हाला होता. मनोधैर्य राखण्यासाठी नियमित योगा तसेच आतल्या आत पायी चालत होतो, असे अनुभव बोगद्यातून सुटका झालेल्या कामगारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी शेअर केले. 

बोगद्यातून सुरक्षित बाहेर पडल्यावर कामगारांनी पंतप्रधान मोदी, मुख्यमंत्री पुष्कर सिंग धामी आणि बचाव पथकांच्या प्रयत्नांचे कौतुक केले. मंगळवारी रात्री उशिरा बचावलेल्या कामगारांशी त्यांच्या दूरध्वनी संभाषणात मोदी त्यांना म्हणाले, “इतके दिवस धोक्यात राहून सुखरूप बाहेर आल्याबद्दल मी तुमचे अभिनंदन करतो. जर काही वाईट घडले असते तर आम्ही ते कसे घेतले असते हे सांगता येत नाही. तुम्ही सर्वांनी खूप धैर्य दाखवले आणि एकमेकांना प्रोत्साहन दिले.” कामगारांना त्यांच्या भावी आयुष्यासाठी पंतप्रधानांनी शुभेच्छा दिल्या. तसेच ‘भारत माता की जय’चा नारा देत संभाषणाचा समारोप केला. 

आम्ही भावासारखे एकत्र होतो...
बिहारमधील कामगार सबा अहमद यांनी पंतप्रधानांना सांगितले की, आम्हाला कोणतीही भीती किंवा चिंता वाटली नाही. आम्ही भावासारखे एकत्र होतो. रात्रीच्या जेवणानंतर आम्ही बोगद्यात फेरफटका मारायचो. मी त्यांना मॉर्निंग वॉक आणि योगा करायला सांगायचो. 

सर्वांची प्रकृती उत्तम
सिलक्यारा बोगद्यातून सुटका करण्यात आलेल्या कामगारांना बुधवारी आरोग्य तपासणीसाठी एम्स-ऋषिकेश येथे नेण्यात आले. त्यासाठी चिनुक हेलिकॉप्टरमधून त्यांना एअरलिफ्ट करण्यात आले, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. कामगारांना बाहेर काढल्यानंतर चिन्यालिसौर येथील रुग्णालयात वैद्यकीय निरीक्षणाखाली ठेवण्यात आले होते. 

मंत्रिमंडळ बैठकीत पंतप्रधान भावुक
मंगळवारी रात्री केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत उत्तराखंड बोगदा बचाव मोहीम चर्चेसाठी आली आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी अत्यंत भावुक होते. प्रत्येकाचा जीव वाचवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले गेले, असे केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी बुधवारी सांगितले. 

Web Title: Hope was not lost, everyone kept their morale, the workers shared their experience with PM Modi after the release

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.