साधारण महिन्याभरापूर्वी आठ महिन्यांचे बाळ गच्चीवरून खाली दुसऱ्या गच्चीच्या छतावर पडले होते. या मुलाला यशस्वीरित्या वाचविण्यात आले होते. परंतु, या घटनेनंतर सोशल मीडियावर त्या बाळाच्या आईला एवढे ट्रोल केले गेले की त्या महिलेने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
चेन्नईमधील ही घटना होती. तुम्ही फोटो पाहिला तर तुमच्या ती घटना लक्षात येईल. चार मजली इमारतीवरून लहान मुल खालच्या गच्चीवरील छतावर पडले होते. याचा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला होता. या बाळाची आई आयटी इंजिनिअर होती. तिला या निष्काळजीपणावरून प्रचंड ट्रोल करण्यात आले होते.
या घटनेनंतर ती तिच्या माहेरी कोईम्बतूरला गेली होती. या महिलेचे नाव व्ही रम्या असे होते. तिचा १९ मे रोजी खोलीत मृतदेह सापडला आहे. २८ एप्रिलला झालेली घटना ती विसरू शकली नव्हती, असे एका वृत्तपत्राला सुत्रांनी माहिती दिली आहे. झी न्यूजने ही बातमी दिली आहे.
सोशल मीडियावर रम्यावर गंभीर टीका करण्यात आली होती. तिने मुद्दामहून मुलाला खाली फेकले असावे असा आरोप करण्यात येत होता. याचा तिच्या मानसिकतेवर एवढा परिणाम झाला की ती चिंताग्रस्त होती. तिचे आई-वडील काही कार्यक्रमानिमित्त बाहेर गेले होते, जेव्हा ते परत आले तेव्हा रम्या बेशुद्ध पडली होती. यामुळे त्यांनी रम्याला हॉस्पिटलमध्ये हलविले, तिथे ती मृत झाल्याचे सांगण्यात आले.