दिल्ली-मुंबई द्रुतगती महामार्गावरील दौसा जिल्ह्याच्या हद्दीत रविवारी भीषण अपघात झाला. या अपघातात एकाच कुटुंबातील तीन जणांचा मृत्यू झाला आहे. नोएडा येथील एक कुटुंब आपल्या मुलाच्या लग्नानंतर गरीबदास महाराजांच्या दर्शनासाठी गेले होते. तेथून परतत असताना मागून येणाऱ्या एका अज्ञात वाहनाने त्यांच्या कारला मागून जोरदार धडक दिली. यामुळे कार उलटली आणि आई-वडील आणि मुलाचा जागीच मृत्यू झाला.
मृतांची ओळख पटली असून, ललित चौहान (३०), महिपाल चौहान (५५) आणि गीता देवी (५०) अशी मृतांची नावे आहेत. ललितची पत्नी पूजा देखील कारमध्ये होती. ती देखील गंभीर जखमी झाली आहे. तिला दौसा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ललित चौहान आणि पूजा यांचे ३ फेब्रुवारी २०२५ रोजी लग्न झाले होते. लग्नानंतर, हे कुटुंब गरीबदास महाराजांच्या दर्शनासाठी राजस्थानला आले होते. यानंत नोएडाला परतत असताना कोल्वा पोलीस ठाण्याच्या हद्दीत त्यांच्या कारला मागून एका अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. ही धडक एवढी भीषण होती की, कार हवेत उडून उलटली, या अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले. या पथकाने कारमध्ये अडकलेल्या लोकांना बाहेर काढले आणि तत्काळ रुग्णालयात दाखल केले. यानंतर, डॉक्टरांनी तपासल्यानंतर, ललित चौहान, महिपाल चौहान आणि गीता देवी यांना मृत घोषित केले. तर, पूजावर उपचार सुरू आहेत. अपघाताची माहिती मृतांच्या कुटुंबीयांना देण्यात आली आहे.
अपघातानंतर पोलीस प्रकरणाचा तपास करत आहेत. अज्ञात वाहनाचा शोध घेतला जात आहे. दरम्यान, शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले आहेत.