रांची:झारखंडच्या रामगढ जिल्ह्यातील राजराप्पा पोलीस स्टेशन परिसरातील मुरबंदा लारीजवळ बस आणि कारची समोरासमोर धडक झाली. बुधवारी झालेल्या या भीषण अपघातात भरधाव बसने कारला जोरदार धडक दिली. या अपघातानंतर दोन्ही वाहनांमध्येर आग लागली. यात कारमधील पाच जणांचा जळून मृत्यू झाला आहे. तर, बसमधील डझनभर प्रवासी जखमी झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, महाराजा नावाची एक प्रवासी बस रामगडहून धनबादकडे जात होती. ही बस समोरुन येणाऱ्या वॅगनार कारला धडकली. या अपघातात कार आणि बसमध्ये आग लागली. आग लागताच बसमधील प्रवासी बाहेर पडले आणि त्यांनी आपला जीव वाचवला. पण, कारमधील लोकांना बाहेर पडता आले नाही.
घटनेची माहिती मिळताच राजरप्पा पोलीस ठाण्याचे प्रभारी निरीक्षक विपीन कुमार घटनास्थळी पोहोचले. बस आणि कारमधील आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाला रामगढहून पाचारण करण्यात आले आहे. अग्नीशमन दलाने कशीबशी आग विझविली पण तोपर्यंत उशीर झाला होता या भीषण अपघातात कारमधील पाच जणांचा जळून मृत्यू झाला.