Himachal Pradesh Political Crisis:काँग्रेसशासितहिमाचल प्रदेशात राजकीय भूकंप आला आहे. राज्यसभा निवडणुकीत पक्षाच्या सहा आमदारांनी क्रास व्होटिंग केले, त्यानंतर आता भाजप सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव आणण्याच्या तयारीत आहे. या सर्व परिस्थितीवरुन काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी-वाड्रा यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवरील पोस्टमध्ये प्रियंका म्हणतात, 'लोकशाहीत सामान्य जनतेला त्यांच्या आवडीचे सरकार निवडण्याचा अधिकार आहे. हिमाचलच्या जनतेने या अधिकाराचा वापर करुन स्पष्ट बहुमताने काँग्रेसचे सरकार स्थापन केले. पण भाजपला पैसा, एजन्सींच्या जोरावर हिमाचलच्या लोकांचा हा अधिकार हिरावून घ्यायचा आहे.'
'25 आमदार असलेला पक्ष 43 आमदार असलेल्या पक्षाला आव्हान देत असेल, तर त्याचा स्पष्ट अर्थ असा होतो की, ते आमदारांच्या घोडे बाजारावर अवलंबून आहे. त्यांची ही वृत्ती अनैतिक आणि असंवैधानिक आहे. हिमाचल आणि देशातील जनता हे सर्व पाहत आहे. नैसर्गिक आपत्तीच्या काळात राज्यातील जनतेच्या पाठीशी न उभ्या राहिलेल्या भाजपाला, आता राज्याला राजकीय संकटात ढकलायचे आहे,' असा आरोप प्रियांका गांधी यांनी केला
कोणाकडे किती जागा आहेत?हिमाचल प्रदेश विधानसभेच्या 68 जागांपैकी काँग्रेसकडे 40 तर भाजपकडे 25 जागा आहेत. उर्वरित तीन जागा अपक्षांकडे आहेत. राज्यातील एका राज्यसभेच्या जागेवर झालेल्या मतदानात काँग्रेसच्या सहा आमदारांनी 'क्रॉस व्होटिंग' केल्याने भाजपने ही जागा जिंकली. भाजपचे उमेदवार हर्ष महाजन यांनी काँग्रेसचे अभिषेक मनू सिंघवी यांचा पराभव केला होता.
पीटीआयनुसार, क्रॉस व्होटिंग करणारे सर्व आमदार बुधवारी सकाळी हेलिकॉप्टरमधून अज्ञातस्थळी रवाना झाले. यामुळे आता राज्यातील सरकार अडचणीत आले आहे. विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री जयराम ठाकूर म्हणाले की, राज्यसभा निवडणुकीच्या निकालांनी काँग्रेस सरकार अल्पमतात असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यांनी मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुखू यांच्या राजीनाम्याची मागणी केली.