भोपाळ - मध्यप्रदेशातील छतरपूर जिल्ह्यात रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे जिवंत व्यक्तीला मृत घोषित करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे गरोदर महिलेची व्यवस्थित काळजी घेतली गेली नाही. महिलेला योग्य ते वैद्यकीय उपचार देण्यात आले नाहीत, शिवाय कोणतीही वैद्यकीय चाचणी न करताच तिला मृत घोषित करण्यात आलं. नातेवाईकांनी अंत्यसंस्कासाठी मृतदेह घरी नेला असता हालचाल होत असल्याचं त्यांना जाणवलं. यानंतर त्यांनी तात्काळ सरकारी रुग्णवाहिकेतून महिलेला जिल्हा रुग्णालयात नेण्याची तयारी सुरु केली. पण महिलेचं दुर्देव इतकं होतं की, रुग्णवाहिकेतील ऑक्सिजन संपला असल्या कारणाने रस्त्यातच तिचा मृत्यू झाला. जेव्हा महिलेला घेऊन नातेवाईक रुग्णालयात पोहोचले तेव्हा तिला मृत घोषित करण्यात आलं. डॉक्टरांच्या दुर्लक्षपणामुळे संतप्त झालेल्या नातेवाईकांना छतरपूर जिल्हा रुग्णालयात जाऊन जोरदार हंगामा केला.
मिळालेल्या माहितीनुसार, अरविंद अहिरवार याची पत्नी भागवती अहिरवारला प्रसूतीसाठी 5 जानेवारीला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. जवळपास दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास भागवती यांनी एका मुलीला जन्म दिला, मात्र त्यांची तब्बेत बिघडली. भागवती यांच्या सासूने दिलेल्या माहितीनुसार, 'तिच्या पोटात प्रचंड वेदना होऊ लागल्या. बेडवरुन खाली पडून ती ओरडत होती. जेव्हा रुग्णालयातील उपस्थित नर्स आणि इतरांना तिला उचलून बेडवर ठेवण्याची विनंती केली तेव्हा त्यांनी दुर्लक्ष केलं. यामुळे तिची तब्बेत अजून बिघडली. यानंतर डॉक्टरांनी तिला मृत्यू झाल्याचं सांगत मृतदेह घरी घेऊन जायला सांगितलं'.
भागवतीला मृत समजून नातेवाईक तिला घरी घेऊन आले आणि अंत्यसंस्काराची तयारी सुरु केली. यावेळी तिच्या शरिरात हालचाल होत असल्याचं काहीजणांच्या लक्षात आलं. भागवतीच्या सासूने सांगितल्यानुसार, तिने डोळेही उघडले होते. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. पत्नीचा मृत्यू झाल्याची माहिती मिळताच अरविंद घरी आला होता. तो येताच भागवतीने डोळे उघडले होते. यानंतर लोकांना आश्चर्याचा धक्का बसला आणि त्यांनी तात्काळ रुग्णवाहिका बोलावून घेतली. भागवतीला घेऊन जेव्हा नातेवाईक छतरपूर जिल्हा रुग्णालयात चालले होते, तेव्हाच रस्त्यात रुग्णवाहिकेतील ऑक्सिजन संपला. यामुळे तिचा रस्त्यातच मृत्यू झाला. रुग्णालयात पोहोचले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं.