सहारणपूर (उत्तर प्रदेश) : सहारणपूर शहरातील जिल्हा महिला रुग्णालयाच्या कर्मचा-यांनी गरोदर महिलेला मध्यरात्री रुग्णालय सोडून जायला सांगितल्यानंतर तिने ई-रिक्षामध्ये मुलाला जन्म दिला, असे पोलिसांनी सांगितले.मुनवर नावाच्या महिलेला त्रास होऊ लागल्यामुळे १४ आॅगस्टच्या रात्री येथील जिल्हा महिला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पण तेथे तिची तपासणी न करता तिला रुग्णालय सोडून जाण्यास कर्मचा-यांनी सांगितले, असे सहारणपूरचे पोलिस अधीक्षक (ग्रामीण) विद्या सागर मिश्रा यांनी बुधवारी सांगितले. त्यामुळे तिला रुग्णालयातून बाहेर जावे लागले.मुनवरचा पती तिला ई रिक्षातून दुस-या रुग्णालयात नेत असताना रिक्षातच तिने मुलाला जन्म दिला. तिला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, असे मिश्रा म्हणाले. मुनवरच्या पतीने जिल्हा महिला रुग्णालयाविरोधात कारवाई करण्यासाठी पोलिसांकडे तक्रार केली आहे. त्यानुसार जनपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला असून चौकशी सुरू आहे. अशीच घटना सहारणपूरमध्ये काही काळापूर्वीही घडली होती. (वृत्तसंस्था)
रुग्णालयाने नाकारले, महिला रिक्षात बाळंत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2017 4:55 AM