इंदूर : मध्यप्रदेशातील इंदूरमध्ये एका हॉटेलची जीर्ण इमारत शनिवारी रात्री कोसळली. या दुर्घटनेत दहा जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत.
इंदूमध्ये सरवटे बस स्थानकाजवळ असलेल्या एमएम या हॉटेलची जुनी चार मजली चार मजली इमारत शनिवारी रात्री साडे नऊच्या सुमारास कोसळली. या दुर्घटनेत आतापर्यंत दहा जणांचा मृत्यू झाला, तर अनेक जण जखमी झाले आहेत. तसेच, या इमारतीच्या ढिगा-याखाली अजून काही जण अडकले असल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. याचबरोबर, इमारतीच्या बाजूला असलेल्या वाहनांचा सुद्धा चक्काचूर झाला आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दलाने तातडीने धाव घेतली आणि बचाव कार्य सुरु केले आहे. तसेच, जखमींवर येथील रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
दरम्यान, हॉटेलची इमारत जीर्ण झाल्याने ती धोकादायक स्थितीत होती. त्यामुळे या इमारतीला धोकादायक असल्याचे महापालिकेने जाहीर केले होते का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. या दुर्घटनेबाबत मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी शोक व्यक्त केला आहे.