श्रीनगर : उत्तर काश्मीरमधील बारामुल्ला जिल्ह्यातील स्की-रिसॉर्ट गुलमर्ग येथे लागलेल्या आगीत हॉटेल हायलँड्स पार्क जळून खाक झाले. ही घटना शनिवारी रात्री घडली. या आगीत हॉटेलच्या झोपड्यांसह साहित्य जळून खाक झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. दरम्यान, बर्फवृष्टीमुळे आग आटोक्यात आल्याने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, असे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.
या आगीच्या घटनेबद्दल जम्मू आणि काश्मीर हॉटेलियर्स क्लबने (JKHC) शोक व्यक्त केला आहे. हायलँड्स पार्क गुलमर्गचा काही भाग जळून खाक झालेल्या दुर्दैवी आगीच्या घटनेने मी दु:खी आहे, असे जम्मू आणि काश्मीर हॉटेलियर्स क्लबचे अध्यक्ष मुश्ताक अहमद छाया यांनी म्हटले आहे.
तसेच, हॉलेट मालकाला जम्मू आणि काश्मीर हॉटेलियर्स क्लबकडून पूर्ण पाठिंब्याचे आश्वासन देताना, एलजी प्रशासन, सचिव पर्यटन, गुलमर्ग विकास प्राधिकरण यांना आगीत नुकसान झालेल्या मालमत्तेच्या पुनर्बांधणीसाठी जलद गतीने परवानगी देण्याची विनंती मुश्ताक अहमद छाया यांनी केली आहे.
ते म्हणाले की, हायलँड्स पार्क हे गुलमर्गमधील प्रमुख मालमत्तांपैकी एक आहे ज्याने अनेक दशकांपासून हॉस्पिटॅलिटी सेक्टरला अतिशय व्यावसायिक पद्धतीने सेवा दिली आहे.