डेहराडून : हॉटेल मालकांच्या विरोधानंतर उत्तराखंडमधील जोशी मठ येथील दोन आलिशान हॉटेल्सची तोडफोड मंगळवारी थांबवण्यात आली. येथील घरांना तडे गेल्यानंतर तज्ज्ञांच्या पथकाने हॉटेल पाडण्याचा निर्णय घेतला आहे. दुसरीकडे धोकादायक घरांमुळे अनेकांचे संसार रस्त्यावर आले आहेत.
जोशी मठमधील मलारी इन आणि हॉटेल माउंट व्ह्यू या आलिशान हॉटेल्सपैकी मलारी इन प्रथम पाडण्यात येणार होते. दोन्ही पाच-सहा मजली हॉटेल्स आहेत. हॉटेल्स पाडण्याबाबत कोणतीही पूर्वसूचना देण्यात आली नाही, असे सांगत हॉटेल मालकांनी या अचानक कारवाईचा निषेध केला. निर्णय घेण्यापूर्वी त्यांच्याशी सरकारने एकरकमी सामंजस्य करार करावा, अशी मागणी त्यांनी केली. मलारी इनचे मालक ठाकूर सिंग आणि माउंट व्ह्यू हॉटेलचे मालक लालमणी सेमवाल यांच्या विरोधानंतर पाडापाडी थांबली.
६७८ इमारती असुरक्षित; ४ हजार लोक सुरक्षित स्थळी
बहुतांश इमारती रिकाम्या केल्या असून, प्रक्रिया अजूनही सुरू आहे. संपूर्ण परिसराचा शास्त्रीय अभ्यास करण्यात येत असून, काही भाग सीलही करण्यात येणार आहेत.
पुनर्वसनाची मागणी
जोशी मठामध्ये लोकांनी मोर्चा काढून योग्य पद्धतीने पुनर्वसन आणि नुकसान भरपाईची मागणी केली. तर, परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय अधिकाऱ्यांनी उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांची भेट घेतली.
उठसूट सुप्रीम कोर्ट कशाला लागते
स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांनी यासंबंधी केलेल्या याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला. १६ जानेवारी रोजी यावर सुनावणी होईल. इतर संस्था आहेत, ज्या या प्रकरणाकडे लक्ष देत आहेत. प्रत्येक प्रकरण आपल्यापर्यंत पोहोचवण्याची गरज नाही, असे न्यायालयाने म्हटले आहे.