नवी दिल्ली – खासगी हॉस्पिटल आणि हॉटेलकडून देण्यात येणाऱ्या व्हॅक्सिनेशन पॅकेजवर सरकारने लसीकरण मोहिमेचं उल्लंघन होत असल्याचा ठपका ठेवला आहे. शनिवारी केंद्र सरकारने एक नोटीस जारी करत खासगी हॉस्पिटलच्या मदतीनं काही हॉटेल व्यावसायिकांनी कोविड १९ वॅक्सिनेशन पॅकेज लोकांना उपलब्ध करत आहेत. ते राष्ट्रीय कोविड लसीकरण कार्यक्रमाच्या मार्गदर्शक सूचनांचे उल्लंघन आहे असं म्हटलं आहे.
सरकारी कार्यक्रमानुसार कोविड १९ लसीकरण कार्यक्रम हा केवळ सरकारी केंद्र आणि खासगी हॉस्पिटलद्वारे संचालित केंद्रावर, सरकारी कार्यालयातही घेतला जाऊ शकतो. वृद्ध आणि दिव्यांग व्यक्तींसाठी त्यांच्या घरापासून जवळच्या केंद्रावर लसीकरण सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये करण्यात येत असलेले लसीकरण नियमांच्या विरोधात आहे. हा प्रकार तातडीनं रोखला पाहिजे असं आरोग्य मंत्रालयाने निर्देश दिलेत.
आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या नोटिसीत म्हटलंय की, सरकारी नियमांचे पालन न करणाऱ्यांवर योग्यशीर कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. हॉटेलकडून व्हॅक्सिनेशन पॅकेज देऊन लोकांना आकर्षित केलं जात आहे हे नियमांचे उल्लंघन करणारे आहे. काही हॉस्पिटलच्या मदतीने हॉटेल्स अशाप्रकारे ऑफर देत आहेत ते दुर्दैवी आहे. राज्य सरकारने अशा लोकांवर कारवाई करावी असे आदेशात म्हटलं आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन म्हणाले की, अशाप्रकारे ऑफर देणं हे दुर्दैवी आहे. हॉटेलमध्ये लसीकरण अभियान हे नियमांच्याविरुद्ध आहे. अशा हॉटेल मालकांवर कारवाई केली जाणार आहे. याबाबत आरोग्य मंत्रालयांने राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांना पत्र लिहून जे कोणी हा प्रकार करत असतील त्यांच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई करावी असे आदेश देण्यात आले आहेत. केंद्र सरकारकडून कोविड १९ लसीकरण अभियानातंर्गत जे काही नियम घालून दिले आहेत त्याप्रमाणे अभियान चालवावं असं म्हटलं आहे.
काही लोकांनी कोरोना काळात पैसे कमवण्याचा धंदा सुरू केला आहे.यातच आता व्हॅक्सिनेशन पॅकेजबद्दल हॉटेल्सकडून लोकांना देण्यात येत असलेल्या ऑफर्सची सोशल मीडियात जोरदार चर्चा सुरू आहे. अनेकांनी हॉटेलकडून देण्यात येत असलेल्या ऑफर्सचे फोटो व्हायरल केले आहेत. त्यामुळे या ऑफर्सवर देशभरातून अनेकांकडून निषेध व्यक्त करण्यात येत आहे.