श्रीनगर - तब्बल 72 दिवसांनी काश्मीरमध्ये पुन्हा एकदा फोन खणाणू लागले आहेत. पोस्टपेड मोबाईल सेवेवरील निर्बंध हटवण्यात आल्यानंतर सोमवारी (14 ऑक्टोबर) दुपारपासून खोऱ्यातील सुमारे 40 लाखांहून अधिक फोन सुरू झाले आहेत. वास्तविक काश्मीर खोऱ्यामधील मोबाईल सेवा शनिवारीच पूर्ववत करण्यात येणार होती. मात्र शेवटच्या क्षणी निर्माण झालेल्या तांत्रिक अडथळ्यांमुळे हा निर्णय लांबणीवर टाकावा लागला होता. मात्र पोस्टपेड मोबाईल सेवा सुरू केल्यानंतर काही तासांतच खबरदारीचा उपाय म्हणून 'एसएमएस' सेवा बंद करण्यात आली आहे.
काश्मीरमधील राज्य सरकारने चार दिवसांपूर्वी पोस्टपेड सेवेवरील निर्बंध हटवण्याची घोषणा केली होती, त्यानंतर मोबाईल सेवा सुरू करण्यात आली आहे. मोबाईल सुरू झाल्यामुळे झालेल्या आनंदावर 'एसएमएस' सेवा रद्द केल्याने विरजण पडले आहे. काश्मीरमधील रहिवाशांना मोबाइल इंटरनेटसाठी अजून काही दिवस वाट पाहावी लागणार आहे. तसेच प्रीपेड मोबाईल सेवा सुरू करण्याबाबतचा निर्णयही होणार आहे.
कलम 370 घटवल्यानंतर निर्माण झालेल्या परिस्थितीत सरकारने खोऱ्यातील सर्व प्रकारच्या मोबाईल सेवा बंद केल्या होत्या. इंटरनेट सेवा सुरू होण्यासाठी मात्र नागरिकांना काही वेळ वाट पाहावी लागणार आहे. मोबाईल सेवा बंद असल्यामुळे काश्मीर खोऱ्यातील सात दक्षलक्ष नागरिकांना गैरसोय सोसावी लागत आहेत. त्यावरून राज्याच्या प्रशासनावर टीकाही होत आहे. प्रशासनाही याबाबतीत अनेक पर्यायांवर विचार करत आहे. काश्मीर खोरे पर्यटकांसाठी खुले करण्याचे निर्देश केंद्र सरकारने नुकतेच दिले आहेत. या पार्श्वभूमीवर राज्य प्रशासनाने पोस्टपेड मोबाईल सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
काश्मीरमध्ये परिस्थिती नियंत्रणात राखण्यासाठी कठोर निर्बंध लादण्यात आले होते. आता काश्मीर खोऱ्यातील परिस्थिती हळुहळू सामान्य होत असून, काश्मीरमधील राज्य प्रशासनाने पर्यटकांना काश्मीरमध्ये न जाण्यासंदर्भात जारी केलेली सिक्यॉरिटी अॅडव्हायजरी मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. 10 ऑक्टोबरपासून ही अॅडव्हायजरी मागे घेण्यात आली असून, त्यानंतर पर्यटकांना काश्मीर खोऱ्यात जाण्याची परवानगी आहे. कलम 370 हटवण्यापूर्वी तीन दिवस आधी 2 ऑगस्ट रोजी एक सिक्यॉरिटी अॅडव्हायजरी जारी करून पर्यटकांना काश्मीरमधून बाहेर जाण्यास सांगितले होते. त्यावेळी दहशतवादी हल्ल्याच्या सावटामुळे अमरनाथ यात्रेकरू आणि पर्यकांना शक्य होईल तितक्या लवकर काश्मीर खोरे सोडण्याचा सल्ला देण्यात आला होता. दरम्यान, जम्मू काश्मीरचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी गृहविभागाकडून काश्मीर खोऱ्यामध्ये जाण्यासाठी जारी करण्यात आलेली ट्रॅव्हल अॅडव्हायजरी हटवण्याचे आदेश दिले.