ऑनलाइन लोकमत
श्रीनगर, दि. 05 - दक्षिण काश्मीरमधील शोपियान जिल्हात ठिकठिकाणी लपून मारून बसलेल्या दहशतवाद्यांना शोधून काढण्यसाठी हेलिकॉप्टर, ड्रोन आणि 4 हजार जवानांनी मोठी शोधमोहीम राबवत पूर्ण जिल्हा गुरुवारी पिंजून काढला.
लष्कर, पोलीस आणि निमलष्करातील जवानांनी संयुक्तरित्या केलेल्या या दहशतवादी शोध मोहिमेत शोपियान जिल्ह्यातील जवळपास 20 गावे पालती घातली. यावेळी काही गावातील रहिवाशांनी जवानांवर दगडफेक सुद्धा केली. यात एक जवानांसाठी वापरण्यात आलेल्या एका टॅक्सी चालकाचा मृत्यू झाल्याचे समजते. याशिवाय मोहिमेदरम्यान अद्याप कोणत्याही प्रकारे जीवितहानी झालेली नाही. मात्र, काही हिंसक गावक-यांनी केलेल्या दगडफेकीत काही जण जखमी झाले आहेत. त्यांना श्रीनगरमधील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
दरम्यान, काश्मीर खोऱ्यातील ही आत्तापर्यंतची सर्वात मोठी शोधमोहीम असल्याचे लष्कराच्या एका अधिकाऱ्याने सांगितले. प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन शोध घेण्याची पद्धत 1990 च्या उत्तरार्धात बंद करण्यात आली होती. त्यानंतर आता ती पुन्हा सुरू करण्यात आली आहे.
शोपियान जिल्ह्यातील काही भागात विदेशी दहशतवाद्यांसह काही दहशतवादी दबा धरून असल्याची खबर गुप्तचर विभागाने दिल्यानंतर या भागात सर्वत्र नाकेबंदी करून कसून शोधमोहीम हाती घेण्यात आली. तुरकावंगन गावातील किरकोळ दगडफेकीचा प्रकार वगळता ही मोहीम सुरळीत होती. एकाही दहशतवाद्याला निसटून जाता येऊ नये म्हणून शोधमोहिमेनंतर खात्री करण्यासाठी हा भाग पुन्हा एकदा पिंजून काढण्यात आला.
गेल्या काही दिवसांपासून दहशतवाद्यांकडून जम्मू-काश्मीरमध्ये बॅंक आणि एटीएमची कॅश व्हॅन लुटण्याचा घटना घडल्या. तसेच, घटनेत पोलिसांवर हल्ला सुद्धा करण्यात आला होता.
दुसरीकडे, भारतीय जवानांच्या मृतदेहाची पाकिस्तानच्या निर्दयी सैनिकांनी केलेल्या घोर विटंबनेचा जरूर बदला घेतला जाईल, असे ठोस संकेत भारताचे लष्करप्रमुख जनरल बिपिन रावत यांनी दिले आहेत. जोवर प्रत्यक्षात कारवाई फत्ते होत नाही, तोवर भारतीय लष्कर आपली कृती योजना उघड करीत नाही, असे स्पष्ट करीत त्यांनी पाकिस्तानच्या या निर्दयी कृत्याला भारतीय सशस्त्र दले तडाखेबाज उत्तर देतील, अशी ठाम ग्वाही दिली आहे.