नवी दिल्ली - खासगी कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या प्रत्येक कर्मचाऱ्याच्या पगारातून एक ठराविक रक्कम कापून कर्मचारीभविष्य निर्वाह निधी (EPFO)मध्ये जमा केली जाते. मात्र काही जणांच्या पीएफ स्टेटमेंटमध्ये नाव, जन्म दिवस किंवा तारीख आधार कार्डमध्ये नमूद करण्यात आलेल्या माहितीसोबत मिळती-जुळती नसल्यानं फंड काढताना अनेक समस्यांचा सामना करावा लागण्याची शक्यता आहेत. नुकतेच सरकारकडून जाहीर करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार, 8.38 कोटींहून अधिक पीएफ अकाऊंटमध्ये सदस्यांचा जन्म दिवसाची चुकीची नोंदणी आहे, तर 11.07 कोटी खातेधारकांच्या सदस्यांच्या वडिलांच्या नावाचा उल्लेखच नाहीय. या सर्व गोष्टींमुळे भविष्यात कोणत्याही अडचणींचा सामना करावा लागू नये, यासाठी पीएफ खात्यामध्ये आपले नाव आणि जन्म तारीखदेखील आधार कार्डमध्ये नमूद करण्यात आलेल्या माहितीशी मिळती-जुळती आहे की नाही?, याची पडताळणी खातेधारकांनी करणे आवश्यक आहे.
जर आधार कार्ड आणि पीएफ खात्यातील खासगी माहिती सारखी नसेल तर ती त्वरित आवश्यक ते बदल करावेत. हा बदल करणं जर तुम्हाला डोकेदुखी वाटत असेल तर तसं अजिबात नाहीय. पीएफ खात्यातील खासगी माहिती बदलणं अगदी सोपे आहे. आपली खासगी माहिती तुम्ही ऑनलाइनदेखील अपडेट करू शकता.
अशी करा माहिती अपडेटपीएफ खात्यात ऑनलाइन सुधारणा करावयाची असल्यास, या 4 गोष्टी महत्त्वपूर्ण आहेत. 1. अॅक्टिव्ह युनिव्हर्सल अकाऊंट नंबर (UAN) 2. EPFO वेबसाइट माहिती 3. आधार नंबर 4. आपला अर्ज EPFO पाठवणे
EPFO खात्यातील माहिती बदलताना सर्वप्रथम आधार कार्डवरील सर्व माहिती योग्य आहे की नाही, याची खात्री करुन घ्यावी. आधार कार्डवरील माहिती चुकीची असल्यास पीएफ खात्यात कोणताही बदल होऊ शकणार नाही. यासाठी तुम्हाला आधी आधार कार्डमध्ये सुधारणा करावी लागेल. त्यानंतरच EPFO खात्यातील माहिती अपडेट होणं शक्य होईल. PF खात्यातील खासगी माहिती कशी अपडेट करावी? हा बदल दोन प्रकारे केला जाऊ शकतो. एक कर्मचाऱ्याकडून आणि दुसरा कंपनीकडून आवश्यक ते बदल केले जाऊ शकतात. - EPFOच्या वेबसाइटला भेट देऊन तेथील माहिती आधार कार्डमध्ये नमूद करण्यात आलेल्या माहितीनुसार बदलावी. - केलेल्या बदलाची माहिती आपल्या कंपनीलाही द्यावी. - आपल्याकडून केलेला बदल सिस्टमवर अपडेट होईल आणि त्यानुसार 'आधार'सोबत माहितीची जोडणी केली जाईल. - पडताळणीनंतर हा माहिती अर्ज कंपनीकडे हस्तांतरित केला जाईल. - यानंतर हा अर्ज कंपनीकडून EPFOकडे पाठवला जाईल. - EPFOकडून आवश्यक त्या सुधारणा केल्या जातील.
खासगी माहितीत ऑफलाइन सुधारणा कशी करावी ? - इंटरनेटशिवाय खासगी माहितीमध्ये सुधारणा करावयाची असल्यास संबंधित अर्ज कर्मचारी आणि कंपनीद्वारे भरल्यानंतर EPFO कार्यालयात पाठवला जाऊ शकतो.