आंध्र प्रदेशातील जगप्रसिद्ध तिरुपती बालाजीच्या प्रसादावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी एका अहवालाचा हवाला देत आरोप केला होता की, पूर्वीच्या जगनमोहन रेड्डी सरकारच्या काळात महाप्रसादम बनवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या तूपात गाईच्या आणि डुकराच्या चरबीची भेसळ होती. टीडीपीने वायएसआर काँग्रेसवर हिंदूंच्या भावना दुखावल्याचा आरोप केला आहे. लाडू बनवण्यासाठी वापरण्यात येणारे तूप शुद्ध नव्हते, त्यात गायीच्या चरबीची भेसळ होती, अशी पुष्टी एका अहवालात करण्यात आली होती. महत्वाचे म्हणजे, हे प्रसादाचे लाडू मंदिराच्या स्वयंपाकघरातच तयार केले जातात आणि त्यांना पोट्टू म्हटले जाते.
असे तयार केले जातात तिरुपतीचे लाडू - महाप्रसादाचे हे लाडू बनवण्याच्या प्रक्रियेला 'दित्तम' असे म्हटले जाते. यात सर्व गोष्टी विशिष्ट प्रमाणात टाकल्या जातात. 300 वर्षांच्या इतिहासात या लाडूंची रेसिपी केवळ सहा वेळाच बदलण्यात आली आहे. तिरुमला तिरुपती देवस्थानम बोर्डाच्या 2016 च्या अहवालानुसार, या लाडूमध्ये एक विशिष्ट प्रकारचा दैवी सुगंध येतो. सर्वप्रथम बेसनापासून बुंदी तयार केली जाते. लाडू खराब होऊ नयेत यासाठी गुळाच्या पाकाचा वापर केला जातो. यानंतर त्यात आवळा, काजू आणि मनुका टाकल्या जातात. बुंदी बनवण्यासाठी तुपाचा वापर केला जातो.
रोज तयार केले जातात तीन लाख लाडू - टाईम्स ऑफ इंडियाच्या एका वृत्तानुसार, टीटीडी रोज साधारणपणे 3 लाख लाडू तयार करते. या लाडूंपासून बोर्डाला एका वर्षात अंदाजे 500 कोटी रुपये मिळतात. मंदिरात प्रसादासाठी 1715 पासून लाडू तयार केले जातात असल्याचे बोलले जाते. 2014 मध्ये तिरुपती लाडूल GI टॅग मिळाला आहे. यामुळे आता या नावाने कुणीही लाडू विकू शकत नाही. या लाडूंमध्ये मुबलक प्रमाणात साखर, काजू आणि मनुके असतात. एका लाडूचे वजन साधारणपणे 175 ग्रॅम एवढे असते.
काय आहे लॅब अहवाल? -जुलै महिन्यात एका लॅब टेस्ट दरम्यान, वायएसआरसीपी सत्तेत असताना प्रसिद्ध तिरुपती मंदिरात प्रसादाचे लाडू बनवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या तुपात प्राण्यांची चरबी आढळून आली. तुपात फिश ऑइल, बीफ फॅट आणि चरबीचे अंश आढळून आले होते. तसेच, चरबी एक अर्ध-घन पांढरे चरबी उत्पादन आहे, जे डुकरांच्या चरबीयुक्त उतकांपासून घेतले जाते.
23 जुलै रोजी लाडूंच्या चवीसंदर्भातील तक्रारीनंतर चौकशी करण्यात आली. यात नारळ, कापूस आणि मोहरीचे तेलही आढळून आले. जून महिन्यात, टीडीपी सरकारने एका वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्याची टीटीडीचे कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती केली होती.