अहमदाबाद: भारतीय जनता पक्षाचे नेते भूपेंद्र पटेल यांनी गुजरातच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. सहा वर्षांपूर्वी नगरसेवक असलेल्या, २०१७ मध्ये पहिल्यांदाच आमदार झालेल्या पटेल यांना मुख्यमंत्री करण्यात येईल अशी कल्पना कोणीही केली नव्हती. मात्र दिग्गजांना धक्का देत भाजप नेतृत्त्वानं त्यांना मुख्यमंत्रिपद दिलं. पुढील वर्षी गुजरातमध्ये विधानसभा निवडणूक होत आहे. तब्बल २६ वर्षांपासून भाजप गुजरातमध्ये सत्तेवर आहे. त्यामुळे सत्ता कायम राखण्याचं आव्हान पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहांवर आहे.
पहिल्यांदाच आमदार झालेल्या भूपेंद्र पटेल यांच्याकडे मुख्यमंत्रिपद देण्यात आल्यानं अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. मात्र यामागे ११ वर्षे जुनी एक गोष्ट आहे. सात वर्षांत पटेल यांनी केलेलं काम नरेंद्र मोदींच्या पसंतीस उतरलं. २०१० ते २०१५ या कालावधीत पटेल अहमदाबाद नगरपालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष होते. त्यानंतर दोन वर्षे त्यांनी अहमदाबाद शहर विकास प्राधिकरणाचं (एयूडीए) अध्यक्षपद सांभाळलं. अनेकदा अधिकारी आणि लोकप्रतिनिधी यांच्यात संघर्ष होतो. मात्र पटेल यांनी या दोन गटांमध्ये उत्तम समन्वय निर्माण केला. त्यामुळे अहमदाबादमधल्या अनेक योजना मार्गी लागल्या.मनातील खदखद डोळ्यांतील अश्रूंमध्ये दिसली, उपमुख्यमंत्र्यांचा कंठ दाटला
२०१० मध्ये थलतेज प्रभागातून नगरसेवक म्हणून निवडून गेलेले पटेल त्याच वर्षी अहमदाबाद नगर पालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष झाले. त्यावेळी मोदी गुजरातचे मुख्यमंत्री होते. अहमदाबादमधले प्रकल्प, तिथल्या विकास योजनांना मोदी यांनी 'गुजरात मॉडेल' म्हणून देशासमोर आणलं. त्यावेळी जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय शहर पुनर्निमाण अभियानाच्या अंतर्गत अहमदाबादला कोट्यवधींचा निधी मिळाला. शहरातील मूलभूत सुविधांच्या विकासासाठी अनेक योजना राबवण्यात आला. त्यांची अंमलबजावणी करण्यात पटेल यांचा मोठा वाटा होता. पटेल यांचं काम मोदींना खूप भावलं होतं.