नवी दिल्ली : नारळ कसे फोडावे, आरती कशी करावी, याबाबतीत न्यायालये कसे हस्तक्षेप करू शकतात, मंदिरांच्या प्रथा-परंपरा प्रस्थापित असतात. याबाबतीत घटनात्मक न्यायालयांनी दखल घ्यावी असे काहीही नसते, असे मत सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केले. तिरुपतीनजीकच्या प्रसिद्ध श्री व्यंकटेश्वर मंदिराच्या पूजाविधीत अनियमतता असल्याचा आरोप करणाऱ्या याचिकेवरील सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने उपरोक्त मत व्यक्त करून श्री बालाजी मंदिराच्या पूजापद्धतीत हस्तक्षेप करण्यास नकार दिला.
भेदभाव करणे किंवा दर्शनासाठी परवानगी न देणे, यासारख्या प्रशासकीय मुद्द्यांच्या बाबतीत न्यायालय दखल देऊ शकते, असे स्पष्ट करून सरन्यायाधीश एन. व्ही. रमना यांनी मंदिर प्रशासनाला असे काही मुद्दे असल्यास आठ आठवड्यांच्या आत याचिकाकर्त्याला उत्तर देण्याचे निर्देश दिले.तिरुपती तिरुमला देवस्थानम (टीटीडी) श्री व्यंकटेश्वर मंदिराचे प्रशासन पाहते. टीटीडीने पूर्वी सर्वोच्च न्यायालयात एक प्रतिज्ञापत्र दाखल केले होते. सेवा/उत्सव वैखनासा अगामनुसार सेवा/उत्सव काटेकोरपणे आयोजित करण्याची योग्य आणि संतुलित प्रथा पूज्य रामानुजाचार्य यांनी सुरू केली आहे. मंदिराचे पुजारी, सेवक प्रामाणिकपणे, श्रद्धा आणि भक्तिभावाने सर्व पूजाविधी करतात.