सासरच्या मंडळींनी आपल्या नव्या सुनेला चांगला मुलगा कसा जन्माला येईल? याचे तंत्र शिकवले होते. महत्वाचे म्हणजे, लग्नाच्या रात्रीच सासरच्यांनी वधूला यासंदर्भात माहिती दिली होती. मात्र, एवढे सर्व करूनही मुलगा झालाच नाही. लग्नाच्या दोन वर्षानंतर सुनेने मुलीला जन्म दिला. यानंतर, सासरच्यांनी तिचा छळ सुरू केला. अखर त्यांच्या टोमण्यांना कंटाळून संबंधित महिलेने सासरच्यांविरोधात केरळ उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. तिने पती आणि सासरच्या मंडळींना शिक्षा देण्याची मागणी केली आहे.
लाइव्ह लॉच्या वृत्तानुसार, संबंधित महिलेने आपल्या याचिकेत म्हटले आहे की, "केवळ मुलगाच नव्हे, तर 'चांगला मुलगा' जन्माला यावा यासाठी शारीरिक संबंधाची नेमकी पद्धत आणि वेळ यासंदर्भात स्पष्ट निर्देश होते. वर आणि त्याच्या कुटुंबीयांनी या गोष्टीवर जोर दिला होता की, याचिकाकर्त्याला देण्यात आलेल्या निर्देशांचे पालन करावे लागेल. कारण मुली नेहमीच आर्थिक भार असतात, असे त्यांचे म्हणने होते."
संबंधित महिलेने सासरच्या मंडळींविरोधात केरळ उच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावला आहे. याचिकाकर्ता महिला 39 वर्षांची असून ती केरळमधील कोल्लम जिल्ह्यातील आहे. तिने म्हटले आहे की, एप्रिल 2012 मध्ये तिचे लग्न झाले. तेव्हा तिला मुलालाच जन्म द्यावा लागेल, असे सांगण्यात आले होते. पण मुलगी झाल्याने पती आणि इतर कुटुंबीयांनी तिचा छळ करायला सुरुवात केली. यासंदर्भात महिलेने अनेक संस्थांशीही संपर्क साधला मात्र उपयोग झाला नाही.
अखेर संबंधित महिलेने उच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावला. येथे उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींनी तिची संपूर्ण तक्रार ऐकून घेत, या प्रकरणावर नाराजी आणि आश्चर्य व्यक्त केले. यासंदर्भात न्यायमूर्ती देवन रामचंद्रन म्हणाले, "केरळसारख्या राज्यात अशा घटना होत आहेत, याचे मला आश्चर्य वाटते." यावर न्यायालयाने केंद्र सरकार आणि राज्य सरकारचेही म्हणणे मागवले आहे. आता 29 फेब्रुवारीला यासंदर्भात पुढील सुनावणी होणार आहे.