नवी दिल्ली- सर्वोच्च न्यायालयानं आज एक महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. विवाहित महिलेनं विवाहित पुरुषाशी संबंध ठेवल्यास फक्त पुरुषालाच दोषी धरता येणार नाही, असं सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट केलं आहे. विवाहबाह्य संबंधावर दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयानं हा निर्णय दिला आहे.
विवाहबाह्य संबंधाला दोन्ही पक्ष पुरुष आणि स्त्री हे दोघेही सारखेच जबाबदार आहेत. विवाहित महिला परपुरुषाबरोबर संबंध प्रस्थापित करत असल्यास पुरुषालाच का दोष दिला जातो, असा प्रश्नही सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांनी उपस्थित केला आहे. भारतीय दंड विधानाच्या कलम 497ला आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. त्यावर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयानं हा निर्णय दिला होता.जर विवाहित महिला पतीच्या परवानगीनं परपुरुषासोबत संबंध ठेवत असल्यास तो गुन्हा नाही. या त्रिसदस्यीय खंडपीठात न्यायमूर्ती आर. एफ. नरिमन, न्यायमूर्ती ए. एम. खानविलकर आणि न्यायमूर्ती इंदू मल्होत्रा यांचाही समावेश आहे. त्यांच्या खंडपीठानं हा निर्णय दिला आहे. परपुरुषाने विवाहित महिलेबरोबर विवाहबाह्य संबंध ठेवल्यास त्या महिलेचा पती परपुरुषावर कलम 497नुसार गुन्हा नोंदवू शकतो. भादंवि कलम 497नुसार या ‘गुन्ह्या’साठी त्या परपुरुषाला पाच वर्षांची शिक्षाही दिली जाऊ शकते. विशेष म्हणजे कायद्यात त्या परपुरुषाबरोबर शारीरिक संबंध प्रस्थापित करणा-या विवाहीत महिलेला गुन्हेगार ठरवलं जात नाही.