S. Jaishankar on American Visa : अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अवैधरित्या अमेरिकेत राहणाऱ्यांवर कडक कारवाईचा इशारा दिला आहे. त्यांच्या या निर्णयामुळे अवैधरित्या अमेरिकेत राहणाऱ्या लाखो भारतीयांचे भविष्य अंधारात आहे. दरम्यान, यावर भारताचे परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी बुधवारी (22 जानेवारी) महत्वाची प्रतिक्रिया दिली आहे.
पीटीआय या वृत्तसंस्थेनुसार, एस. जयशंकर त्या बातम्यांबाबत विचारलेल्या प्रश्नांची उत्तर देत होते, ज्यात दावा केला जातोय की, भारत सरकार ट्रम्प सरकारसोबत मिळून अमेरिकेत राहणाऱ्या सूमारे 1,80,000 भारतीयांना परत आणण्यावर काम करत आहे. यापैकी काही अवैधरित्या अमेरिकेत पोहोचले आहेत, तर काही व्हिसाची मुदत संपल्यानंतरदेखील तिथेच राहत आहेत. यावर जयशंकर म्हणाले की, अमेरिकेत वैध कागदपत्रांशिवाय राहणाऱ्या भारतीयांना कायदेशीररित्या परत आणण्यासाठी भारत तयार आहे. आम्ही अशा सर्व लोकांना परत आणण्यासाठी अमेरिकेसोबत काम करत आहोत.
याबाबत अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ यांच्याशी बोलणे झाल्याचे जयशंकर यांनी सांगितले. याशिवाय, अमेरिकेचा व्हिसा मिळविण्यासाठी 400 दिवसांचा प्रतीक्षा कालावधी असेल, तर मला नाही वाटत की, यामुळे संबंध सुधारतील. सरकार म्हणून आम्ही साहजिकच कायदेशीररित्या अमेरिकेत जाण्याच्या बाजूने आहोत. भारतीय प्रतिभा आणि भारतीय कौशल्यांना जागतिक स्तरावर जास्तीत जास्त संधी मिळाव्यात अशी, आमची इच्छा आहे. त्याचबरोबर बेकायदेशीर हालचाली आणि बेकायदेशीर स्थलांतरालाही आमचा कडाडून विरोध असेल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.