अमृतपाल सिंग पोलिसांच्या हातातून निसटलाच कसा? हायकोर्टाने पंजाब सरकारला तीव्र शब्दात फटकारले
By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2023 05:32 AM2023-03-22T05:32:47+5:302023-03-22T06:31:59+5:30
अमृतपाल सिंगला पळून जाण्यास मदत केल्याप्रकरणी मनप्रीतसिंग ऊर्फ मन्ना, गुरदीपसिंग ऊर्फ दीपा, हरप्रीतसिंग ऊर्फ हॅप्पी आणि गुरभेज सिंग ऊर्फ भेजा या चौघांना अटक केली आहे.
चंडीगड : खलिस्तानसमर्थक अमृतपाल सिंगला पकडण्यात अपयश आल्यानंतर गुप्तचर विभागाच्या कामावर नाराजी व्यक्त करत उच्च न्यायालयानेपंजाब सरकारवर ताशेरे ओढले. न्या. शेखावत यांनी पंजाबचे महाधिवक्ता विनोद घई यांना विचारले की, तुमच्याकडे ८० हजार पाेलिस असताना आणि संपूर्ण ऑपरेशन बारकाईने आखले गेले असताना अमृतपाल सिंग हातातून कसा सुटला?
पंजाब सरकारने मंगळवारी पंजाब आणि हरयाणा उच्च न्यायालयाला सांगितले की, अमृतपाल सिंगविरोधात रासुकाच्या तरतुदी लागू केल्या आहेत. न्यायालयात ॲडव्होकेट इमाम सिंह खारा यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी झाली. खारा हे अमृतपाल सिंग आणि त्याच्या ‘वारीस पंजाब दे’ संस्थेचे कायदेशीर सल्लागार आहेत. अमृतपाल सिंगला पोलिसांच्या कथित कोठडीतून मुक्त करण्याची विनंती यात केली आहे.
पळून जाण्यात मदत करणारे जेरबंद; अमृतपालची छायाचित्रे पाेलिसांकडून जारी
अमृतपाल सिंगला पळून जाण्यास मदत केल्याप्रकरणी मनप्रीतसिंग ऊर्फ मन्ना, गुरदीपसिंग ऊर्फ दीपा, हरप्रीतसिंग ऊर्फ हॅप्पी आणि गुरभेज सिंग ऊर्फ भेजा या चौघांना अटक केली आहे. चौकशीदरम्यान असेही समजले आहे की, तो जालंधर येथील नंगल अंबियन गावातील गुरुद्वारात गेला होता. तिथे त्याने कपडे बदलले. शर्ट आणि पँट परिधान केली आणि इतर तिघांसह दोन दुचाकींवर ते पळाले. एक कार जप्त करण्यात आली असून, त्यात रायफल, काही तलवारी आणि एक वॉकीटॉकी सेट मिळाला आहे. पोलिसांनी अमृतपालची वेगवेगळ्या पोशाखांतील ४ छायाचित्रेही प्रसिद्ध केली आणि लोकांना त्याचा शोध घेण्यास मदत करण्याचे आवाहन केले.
सुरक्षेच्या कारणास्तव संयम बाळगला
पंजाबचे महाधिवक्ता म्हणाले की, पोलिसांनी सुरक्षेसाठी संयम बाळगला; कारण ही कारवाई लोकवस्तीच्या भागात होती. घई म्हणाले की, काही बाबी संवेदनशील आहेत की, त्या खुल्या न्यायालयात स्पष्ट करता येत नाहीत. अमृतपाल सिंगचे वडील तरसेम सिंग हेही कोर्टरूममध्ये पोहोचले. त्यावर कोर्टाने सांगितले की, ते यात पक्षकार नसल्याने त्यांचा युक्तिवाद ऐकून घेता येणार नाही.
शनिवारपासून धरपकड
‘वारीस पंजाब दे’च्या सदस्यांविरोधात मोठी कारवाई सुरू आहे. अमृतपाल सिंग पोलिसांना गुंगारा देऊन पळून जाण्यात यशस्वी झाला. पोलिसांचे म्हणणे आहे की, अमृतपाल हा त्यांनी लावलेल्या सापळ्यातून सुटल्यानंतर फरार झाला.