सिमला: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिमाचल प्रदेशमधील काँग्रेसचे लोकनियुक्त सरकार पाडण्याचे हरप्रकारे प्रयत्न केले, असा आरोप काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी सोमवारी केला. त्या म्हणाल्या की, काँग्रेसचे सरकार उलथविण्यासाठी धनशक्तीचाही प्रयोग करण्याचा प्रयत्न झाला.
कांगडा लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार व त्या पक्षाचे नेते आनंद शर्मा यांच्यासाठी प्रियांका गांधी यांनी चंबा येथे प्रचारसभा घेतली. त्या म्हणाल्या की, काँग्रेस सुमारे ५५ वर्षे देशात सत्तेवर होती, मात्र ती सर्वात श्रीमंत पक्ष कधीच बनली नाही. दुसऱ्या बाजूस गेल्या १० वर्षांत भाजप हा जगातील सर्वात श्रीमंत पक्ष बनला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिमाचल प्रदेशमधील काँग्रेसचे राज्य सरकार पाडण्यासाठी सर्व प्रकारचे प्रयत्न केले. पंतप्रधानांसारखे नेते तुम्हाला हवेत का, असा सवालही त्यांनी प्रचारसभेला आलेल्या लोकांना विचारला. देवाच्या नावावर लोकांची दिशाभूल करणे यासारख्या गोष्टी भाजपचे नेते करतात, असे त्या म्हणाल्या,