नवी दिल्ली: काही दिवसांपूर्वीच भारताचे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपिन रावत(CDS General Bipin Rawat) आणि त्यांच्या पत्नीसह लष्कराच्या 11 अधिकाऱ्यांचा हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू झाला होता. त्या अपघाताचे कारण शोधण्यासाठी सरकारने एक समिती नेमली होती. आता सरकारी सूत्रांकडून मिळालेल्य माहितीनुसार, या समितीचा तपास वेगाने सुरू असून, पुढील दोन आठवड्यांत समिती आपली रिपोर्ट सादर करू शकते.
संरक्षण मंत्रालयाने नेमलेल्या या समितेचे नेतृत्व वायुसेनेचे अधिकारी आणि देशातील सर्वश्रेष्ठ हेलिकॉप्टर पायलटांपैकी एक असलेले एअर मार्शल मानवेंद्र सिंग आणि नौदलाचे ब्रिगेडियर दर्जाचे अधिकारी करत आहेत. सरकारी सूत्रांनी वृत्त संस्थेला सांगितल्यानुसार, तमिळनाडूच्या निलगिरी जिल्ह्यातील अपघात स्थळाजवळ उपस्थित असलेल्या साक्षीदारांचे जबाब नोंदवले जात आहेत. घटनेनंतर दुसऱ्याच दिवशी तपास पथकांनी आपले काम सुरू केले होते. त्यामुळे आता पुढील दोन आठवड्यांत या पथकाने आपली कार्यवाही पूर्ण करणे अपेक्षित आहे.
तपासावर संरक्षण मंत्र्यांचे लक्षसंरक्षण मंत्री राजनाथ सिंह वैयक्तिकरित्या या तपास प्रक्रियेवर लक्ष ठेवून आहेत आणि संबंधित अधिकाऱ्यांकडून ते नियमितपणे अपडेट घेत आहेत. भारतीय हवाई दलाचे प्रमुख एअर चीफ मार्शल व्हीआर चौधरी हे देखील कारवाईवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. लष्कराचे मुख्यालय तपासाच्या निकालाची आतुरतेने वाट पाहत आहे. दरम्यान, संरक्षण मंत्रालयाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने गुरुवारी सांगितले की, नवीन सीडीएस नियुक्त करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून लवकरच नाव जाहीर केले जाईल.
8 डिसेंबर रोजी हा अपघात झाला
8 डिसेंबर रोजी जनरल बिपिन रावत, एमआय-17 व्ही 5 हेलिकॉप्टरमधून प्रवास करत होते. त्यांची पत्नी मधुलिका रावत आणि इतर 12 लष्करी अधिकारी वेलिंग्टनमधील संरक्षण सेवा कर्मचारी महाविद्यालयात उतरण्याच्या काही मिनिटांपूर्वी अपघात झाला. यात सर्वांचा त्याच दिवशी मृत्यू झाला, तर एका अधिकाऱ्याची 15 डिसेंबर रोजी उपचारादरम्यान प्राणज्योत मालवली.