Bharat Name Story: 'इंडिया' नव्हे, भारत..!! पुन्हा एकदा चर्चेला उधाण आले आहे. राज्यघटनेतून 'इंडिया' हा शब्द काढून टाकण्यावर यापूर्वीही भर देण्यात आला होता, त्यातच आता पुन्हा याबाबत मोठं पाऊल उचलण्यात आले आहे. राष्ट्रीय स्वयंसंघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी लोकांना 'इंडिया' ऐवजी भारत हे नाव वापरण्याचे आवाहन केले आहे. तशातच, G20 शिखर परिषदेच्या निमंत्रण पत्रिकेवर 'प्रेसिडेंट ऑफ भारत' असा उल्लेख दिसला. त्यामुळे नव्या चर्चांना उधाण आले आहे. 18 ते 22 सप्टेंबर या कालावधीत होणाऱ्या संसदेच्या विशेष अधिवेशनात मोदी सरकार भारतीय राज्यघटनेतून 'इंडिया' हा शब्द काढून टाकण्यासंबंधी विधेयक मांडू शकते, अशीही शक्यता वर्तवली जात आहे. अशा परिस्थितीत भारत देशाच्या नावामागील 'प्रवास' जाणून घेणे आणि समजून घेणे आपल्या सर्वांसाठी खूप महत्वाचे आहे.
प्राचीन काळापासून आपल्या देशाला वेगवेगळी नावे आहेत. प्राचीन ग्रंथांमध्ये देशाची वेगवेगळी नावे लिहिली गेली - जंबुद्वीप, भरतखंड, हिमवर्ष, अजनाभ वर्ष, आर्यावर्त. त्यानंतरच्या काळातील इतिहासकारांनी हिंद, हिंदुस्थान, भारतवर्ष, भारत अशी नावेही दिली. पण त्यात भारत सर्वाधिक लोकप्रिय ठरले.
भारत आणि भारतवर्ष हे नाव कसे पडले?
याबाबत अनेक दावे केले जातात. वाचूया यासंदर्भात अधिक माहिती-
- विष्णु पुराणात असे आढळून आले आहे की 'भारताच्या सीमा समुद्राच्या उत्तरेपासून हिमालयाच्या दक्षिणेपर्यंत पसरलेल्या आहेत. विष्णु पुराण सांगते की ऋषभदेव जेव्हा केवळ गळ्यात उपर्ण बांधून नग्न अवस्थेत जंगलात निघून गेले तेव्हा त्यांनी आपला ज्येष्ठ पुत्र भरत याला वारसा दिला त्यामुळे या देशाचे नाव भारतवर्ष पडले. आपले संपूर्ण राष्ट्र काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत आहे. हे भारताच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत आहे असे म्हटले जाते.
- राजा दुष्यंत आणि महाभारतातील शकुंतलाचा पुत्र भरत याच्या नावावरून देशाचे नाव भारत ठेवण्यात आले, अशी एक मान्यता आहे.
- आणखी एक दावा असा की भरत नावाचा एक चक्रवर्ती सम्राटदेखील होऊन गेला. त्याचा नावलौकिक चहुदिशांना पसरला होता आणि त्याला चार दिशांचा स्वामी मानले जायचे. भरत सम्राटाच्या नावावरून देशाचे नाव ‘भारतवर्ष’ ठेवण्यात आल्याचा दावाही केला जातो. वर्ष म्हणजे संस्कृतमध्ये क्षेत्र किंवा भाग असाही अर्थ होतो.
- पौराणिक युगातील मान्यतेनुसार, भरत या नावाच्या अनेक व्यक्ति होऊन गेल्या ज्यांच्या नावावरून भारत हे नाव पडल्याचे मानले जाते. एक दावा असाही केला जातो की सम्राट भरत याच्या नावामुळेच आपल्या देशाचे नाव 'भारतवर्ष' पडले.
- सर्वात लोकप्रिय मान्यतेनुसार, दशरथपुत्र आणि भगवान श्री राम यांचा धाकटा भाऊ भरत यांच्या नावावरून या देशाचे नाव भारत ठेवले गेले. श्री राम चरित मानसनुसार, राम वनवासात गेल्यावर, भरताने रामाच्या पादुका सिंहासनावर ठेवल्या, पण तो स्वतः विराजमान झाला नाही. त्याचा त्याग आणि निस्सीम प्रेमाने त्याला महान राजा बनवले. त्याच्या नावावरून देशाला भारत हे नाव देण्यात आले.
- नाट्यशास्त्रात उल्लेख असलेल्या भरतमुनींच्या नावावरून देशाचे नाव भारत पडले, अशीही एक धारणा आहे. हे राजर्षी भरताबद्दल देखील सांगितले जाते.
- मत्स्य पुराणात असा उल्लेख आहे की ज्या वराने लोकांना जन्म दिला आणि त्यांची काळजी घेतली त्यामुळे मनुला भरत म्हटले गेले. जैन परंपरेतही भरत नावाचा आधार सापडतो.