दिल्लीतील नागरिकांसाठी भाजप खासदार आणि माजी क्रिकेटपटू गौतम गंभीर यानं रेमडेसिवीर आणि फॅबीफ्लू औषधांचं मोफत वाटप केलं. कोरोना काळात रेमडेसिवीर इंजेक्शनची मागणी मोठ्या प्रमाणावत वाढली होती. त्यामुळे रुग्णांना ते सहज उपलब्ध होत नव्हतं. याच मुद्द्यावरुन दिल्ली हायकोर्टानं गौतम गंभीर याला खडेबोल सुनावले आहेत.
"गौतम गंभीर एक आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू राहिला आहे. ते आता एक राजकीय नेते देखील आहे. त्यांनी गरजूंना रेमडेसिवीर आणि फॅबीफ्लूची औषधं वाटली. पण त्यांनी केलेल्या मदतीचं स्वरुप हे योग्य होतं का? त्यांच्या वागण्याला जबाबदार नागरिकाचं वागणं म्हणता येईल का? देशात जेव्हा या औषधांचा मोठ्या प्रमाणात तुटवडा निर्माण झालेला असताना त्याचा साठा आपल्याकडे करणं योग्य ठरेल का याचा विचार त्यांनी का नाही केला?, अशा प्रश्नांची सरबत्तीच हायकोर्टानं उपस्थित केली आहे.
कुणाच्या प्रिस्क्रिप्शननं इतक्या मोठ्या प्रमाणात औषधं गौतम गंभीर यांना उपलब्ध करुन दिली गेली, असाही सवाल हायकोर्टानं विचारला आहे. ड्रग कंट्रोलर ऑफ इंडियानं या प्रकरणात लक्ष घालावं आणि औषधांचा असा मोठ्या प्रमाणात साठा करणं गुन्हा नाही का याची पडताळणीकरुन योग्यती कारवाई करावी, अशा सूचना हायकोर्टानं दिल्या आहेत. यात एकट्या गौतम गंभीर यांच्यावर नव्हे, तर ज्या डॉक्टरनं इतक्या मोठ्या प्रमाणात औषधं मागवण्यासाठी प्रिस्क्रिप्शन दिलं, ज्या केमिस्टनं पुरवठा केला यासर्वांची माहिती घेऊन त्यांना यात जबाबदार धरावं, असंही हायकोर्टानं नमूद केलं आहे. हायकोर्टानं घेतलेल्या भूमिकेमुळे आता भाजप खासदार गौतम गंभीर याला रेमडेसिवीर आणि फॅबीफ्लू औषधांचं वाटप प्रकरणं भोवणार असल्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.