लोकसभा निवडणुकीसाठी भाजपचा जबरदस्त प्रचार सुरू आहे. दरम्यान, तीन तलाक कायद्यासंदर्भात बोलताना, तीन तलाक कायद्याचा लाभ केवळ महिलांनाच नाही, तर मुस्लीम पुरुषांनाही झाला असल्याचे पंतप्रधान नरेद्र मोदी यांनी म्हटले आहे. ते उत्तर प्रदेशातील सहारनपूर येथे एका रॅलीला संबोधित करत होते. यावेळी त्यांनी विरोधकांवरही जबरदस्त निशाणा साधला आणि सरकारच्या कामगिरीचीही माहिती दिली.
तीन तलाक कायद्याचा मुस्लीम पुरुषांना कसा झाला फायदा? -पंतप्रधान मोदी म्हणाले, काही लोकांना वाटते की, तीन तलाक कायद्याचा फायदा केवळ मुस्लीम महिलांनाच झाला आहे. मात्र, असे नाही. कारण प्रत्येक मुस्लीम पुरुष हा कुणाचा तरी पिता आहे, कुणाचा तरी भाऊ आहे. तीन तलाक कायदा लागू झाल्याने, आता मुस्लिम पुरुष, आपल्या मुलीला एखाद्या मुद्द्यावरून तीन तलाक न दिला जावो, तिला परत माहेरी न पाठवले जवौ, या तणावातून बाहेर पडले आहेत.
I.N.D.I.A. वर निशाणा -I.N.D.I.A. वर निशाणा साधताना मोदी म्हणाले, सपाची स्थिती अशी आहे की, त्यांना तासा-तासाला उमेदवार बदलावे लागत आहेत. याशिवया, काँग्रेसची स्थिती तर आणखीनच विचित्र आहे, काँग्रेसला उमेदवारच मिळेना. काँग्रेस ज्या जागांना आपला बालेकिल्ला मानते त्या जागांवरही त्यांना उमेदवार मिळेना. याचा अर्थ I.N.D.I.A. आघाडी हे अस्थिरता आणि अनिश्चिततेचे दुसरे नाव बनले आहे. त्यामुळे आज त्यांनी सांगितलेली एकही गोष्ट देश गांभीर्याने घेत नाही.