मृत्यूच्या बोगद्यात १७ दिवस कसे जगले कामगार?; ३ दिवसांनी व्हिडिओ आले समोर
By ऑनलाइन लोकमत | Published: December 3, 2023 09:54 AM2023-12-03T09:54:01+5:302023-12-03T09:54:26+5:30
पहिल्या व्हिडिओत तीन मजूर दिसतात. ज्या पाइपने जेवण आत येते तो पाइप मजूर दाखवत आहे
उत्तरकाशी : उत्तराखंडमधील उत्तरकाशीजवळील सिलक्यारा बोगद्यात १७ दिवस अडकून पडलेल्या ४१ मजुरांचे बोगद्यात असतानाचे दोन व्हिडीओ समोर आले आहेत. आत त्यांनी कसे दिवस घालविले याची माहिती यात मिळते. बोगद्यात अडकलेल्यांपैकी एका मजुराने हे व्हिडिओ बनविले आहेत. बोगद्यातून सुटका झाल्यानंतर तीन दिवसांनी हे व्हिडिओ समोर आले आहेत.
पहिला व्हिडिओ बोगद्यात अडकल्यानंतर आठव्या दिवशी, तर दुसरा १३ व्या दिवशी घेतलेला आहे. बोगद्याच्या २४०० मीटर पट्ट्यात हे मजूर कसे राहत आहेत, हे यात दिसते. बोगद्याच्या बांधकामात वॉटरप्रुफिंगसाठी वापरल्या जाणाऱ्या जिओ टेक्स्टाइल शीट त्यांनी पांघरल्याचे दिसते. सरकारने आत कोणकोणते साहित्य पाठविले, हेही दिसून येते.
पहिल्या व्हिडिओत तीन मजूर दिसतात. ज्या पाइपने जेवण आत येते तो पाइप मजूर दाखवत आहे. तेथेच बिछाणे आहेत. जवळच जेवणाची पाकिटे व पाण्याच्या बाटल्या पडल्या आहेत. नंतर मजूर मलबा पडलेल्या ठिकाणी जातो. जवळच हायड्रॉलिक मशीन आहे. तिच्यावर बसून बाहेर येत असताना बोगदा ढासळून आम्ही आत अडकलो, असे मजूर सांगतो. पुढे २ लेनचा रस्ता दिसतो आणि मजुरांचे बिछाणे दिसतात. एक चारचाकी गाडी दिसते. तिचा वापर करून ते झऱ्याचे पाणी आणत असत.
दुसऱ्या व्हिडिओत सुरुवातीलाच खूप फळे दिसतात. सरकारने पाइपातून ती पाठविलेली आहेत. त्यानंतर मजूर आपल्याला दंतमंजन, ब्रश आणि टॉवेल दाखवितो. जेवण पाठविलेल्या बाटल्याही दाखवितो.