संसदेत प्रश्न विचारण्याच्या बदल्यात पैसे घेतल्याच्या आरोपात अडकलेल्या तृणमूलच्या खासदार महुआ मोईत्रा यांना भाजपा खासदार निशिकांत दुबे यांनी आणखी एक प्रश्न विचारला आहे. महुआ यांचे नाव न घेता दुबे यांनी ट्विट केले आहे. दुबईच्या हॉटेलमध्ये थांबण्याचे ५५०० डॉलर्स एवढे आवाढव्य बिल कसे काय भरले? असा सवाल त्यांनी केला आहे.
साडे पाच हजार डॉलरचे बिल भारतातून चेकने भरले गेले की दुबईत हवाला मार्गे गेले असा सवाल दुबे यांनी केला आहे. हा पैसा मेल आयडी खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यानेच दिला का? असा सवाल करत दुबे यांनी आयकर आणि ईडी विभागालाही टॅग केले आहे. यामुळे महुआंवर आता आयकर विभागाची चौकशी लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
कॅश फॉर क्वेरी प्रकरणात टीएमसी खासदार महुआ मोईत्रा यांच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे. सीबीआयने या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. आम्ही लोकपालच्या आदेशानुसार तपास सुरू केला आहे. आम्ही अद्याप महुआ मोईत्रांविरुद्ध प्राथमिक चौकशी किंवा एफआयआर दाखल केलेला नाही, असे सीबीआय़ने म्हटले आहे.
भाजप खासदार निशिकांत दुबे यांच्या तक्रारीच्या आधारे मोईत्रांविरुद्ध सीबीआय चौकशी सुरू करण्यात आली होती. TMC नेत्यावर संसदेत प्रश्न विचारण्यासाठी एका व्यावसायिकाकडून लाच घेतल्याचा आरोप केला होता. मोईत्रा यांचे लोकसभा आयडीवरून दुबईतून अनेकदा लॉगिन झाल्याचेही तपासात समोर आले होते. यावरून संसदेने मोईत्रांची चौकशीही लावली होती.