सरकार चुकीची धोरणे राबवीत असेल, चुकीचे निर्णय घेत असेल, सूडबुद्धीने वागत असेल किंवा अन्य कोणतीही लोकशाहीविरोधी कृती करीत असेल, तर त्याविरुद्ध बोलणे विरोधकांचे कर्तव्य आहे. सरकारने या टीकेकडे सकारात्मक दृष्टीने पाहून चुक सुधारली पाहिजे. परंतु, आज सरकारचा विरोध केला की, तोंड दाबण्याचा प्रयत्न होतो. हे दबावतंत्र लोकशाहीला मारक आहे. ज्यांच्यावर आधी ईडी, सीबीआय व इतर तपास यंत्रणा कारवाया करतात, ते भाजपमध्ये प्रवेश केला की स्वच्छ कसे होतात, त्यांचे अपराध कसे पोटात घेतले जातात, असा सवाल भारतीय कम्युनिस्ट पार्टी (मार्क्सवादी)चे सरचिटणीस सीताराम येचुरी यांनी उपस्थित केला. वरिष्ठ पत्रकार राज चावला यांनी ‘लाेकमत नॅशनल काॅन्क्लेव्ह’मध्ये येचुरी यांची मुलाखत घेतली.
काळानुसार लोकशाही पुढे जायला पाहिजे. परंतु, भारतीय लोकशाहीची पीछेहाट होत आहे. सध्याच्या देशातल्या परिस्थितीत लोकशाही बळकट होऊ शकत नाही, अशी भीती त्यांनी व्यक्त केली. निवडणुकीतल्या हिंसाचारावर ते म्हणाले की, ही चिंताजनक बाब असून निवडणुका नेहमीच शांततेच्या वातावरणात पार पडल्या पाहिजे. निवडणुकीत केवळ भारतीय जनता पक्षच हिंसा करतो असे नाही. परंतु, हा पक्ष बरेचदा इतर पक्षांवर हिंसाचाराचे तथ्यहीन आरोप करतो. अनेकदा सोशल मीडियामुळे हिंसा होते. सोशल मीडियाचा गैरवापर गंभीर समस्या झाली आहे. त्यामुळे प्रत्येक राजकीय पक्षाने जबाबदारीने वागणे आवश्यक आहे. न्यायालये व चौकशी समित्यांना त्यांचे काम करू दिले पाहिजे. परंतु, वाईट हेतूने केलेल्या कारवाईचे समर्थन होऊ शकत नाही, असे मत येचुरी यांनी मांडले. सरकारच्याच आकडेवारीनुसार देशात दोन कोटी ५० लाख युवक बेरोजगार आहेत. पायाभूत सुविधांवरचा खर्च वाढवला म्हणता तर युवकांना नोकऱ्या का मिळत नाहीत? याचाच अर्थ, सरकार केवळ खोटा प्रचार करते, वास्तव वेगळेच असते, अशी टीकाही त्यांनी केली.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"