निवडणुकांपूर्वीच मोदींना कसं कळतं की ३७० जागा जिंकणार?; काँग्रेसचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Published: February 6, 2024 01:33 PM2024-02-06T13:33:56+5:302024-02-06T14:11:49+5:30

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेतील भाषणाच्या सुरुवातीपासूनच काँग्रेसवर सडकून टीका केली.

How does Modi know before the elections that he will win 370 seats?; Suspicious question of Congress by adhir ranjan chowdhary | निवडणुकांपूर्वीच मोदींना कसं कळतं की ३७० जागा जिंकणार?; काँग्रेसचा सवाल

निवडणुकांपूर्वीच मोदींना कसं कळतं की ३७० जागा जिंकणार?; काँग्रेसचा सवाल

नवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर प्रतिक्रिया देताना मोदी सरकार २ च्या कार्यकाळातील शेवटचे संसदीय भाषण केले. आपल्या भाषणात मोदींनी काँग्रेसवर जोरदार टीका करताना तिसऱ्यांदा मोदी सरकारच सत्तेवर येणार असल्याचेही म्हटले. आता आमच्या सरकारचा तिसरा कार्यकाळ दूर नाही. जास्तीत जास्त १०० ते १२५ दिवस राहिले आहेत. केवळ काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे नाही, तर संपूर्ण देश सांगत आहे की, ‘अब की बार ४०० पार’. शक्यतो या आकड्यांच्या खेळात जात नाही. मात्र, देशाचे मत आणि सूर समजू लागला आहे. राष्ट्रीय लोकशाही आघाडीला ४०० पेक्षा जास्त जागा मिळतीलच, मात्र भारतीय जनता पार्टीला ३७० जागांवर विजयी करतील, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला. मोदींच्या या दाव्यावर आता काँग्रेसने प्रश्न उपस्थित केला आहे. 

नरेंद्र मोदी यांनी भाषणाच्या सुरुवातीपासूनच काँग्रेसवर सडकून टीका केली. पुढे बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, आमच्या सरकारचा तिसरा कार्यकाळ खूप मोठ्या निर्णयांचा ठरणार आहे. लाल किल्यावरून भाषण करताना सांगितले होते. तसेच राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यातही त्याबाबतचा पुनरुच्चार केला होता. पुढील एक हजार वर्षांपर्यंत देशाला समृद्ध आणि सिद्धीच्या सर्वोच्च शिखरावर पोहोचलेले पाहायचे आहे. तिसऱ्या कार्यकाळात पुढील हजार वर्षांच्या देशाच्या वाटचालीसाठी एक मजूबत पाया तयार केला जाईल. देशातील १४० कोटी जनतेच्या क्षमतेवर माझा खूप मोठा विश्वास आहे. त्यामुळे, भाजपला ३७० आणि एनडीएला ४०० पेक्षा जास्त जागा जिंकता येतील, असे पंतप्रधान मोदींनी म्हटले. मोदींच्या या विधानावर आक्षेप घेत लोकसभेतील विरोधी पक्षनेते अधीर रंजन चौधरी यांनी सवाल उपस्थित केला आहे. निवडणुकांपूर्वीच मोदींना हे कसं समजलं?, असे चौधरी यांनी म्हटले. 

निवडणुका होण्यापूर्वीच मोदींना कसं समजतं की भाजपाच्या ३७० जागा निवडून येणार आहेत. मात्र, यासारख्या विजयाचा दावा जर कोणी करत असेल तर, आतमध्ये काही गूढ लपलंय, ते गूढ ईव्हीएममध्येही लपलं आहे, असे म्हणत लोकसभा विरोधी पक्षनेते अधीर रंजन चौधरी यांनी मोदींच्या भाषणावर प्रत्युत्तर दिले. तसेच, आगामी निवडणुकीत भाजपाला ३७० आणि एनडीएला ४०० पेक्षा जास्त जागा मिळणार, या मोदींनी केलेल्या दाव्यावरही प्रत्युत्तर दिले. 

मोदींच्या या दाव्यानंतर आता सर्वसामान्यांचा मत देण्याचा अधिकार राहिल की नाही, यावरही प्रश्न उपस्थित होत आहेत. तर, शेवटी देशाच्या निवडणूक प्रक्रियेची खिल्ली उडवली जाईल, असेही अधीर रंजन चौधरी यांनी म्हटले.  

ओबीसी समाजावर यूपीए सरकारने अन्याय केला

काँग्रेस पक्ष आणि यूपीए सरकारने ओबीसींना न्याय दिला नाही. ओबीसी समाजावर अन्याय केला. काही दिवसांपूर्वी कर्पूरी ठाकूर यांना भारतरत्न प्रदान करण्यात आला. त्यांचा आम्ही सन्मान केला. सन १९७० मध्ये जेव्हा ते मुख्यमंत्री झाले, तेव्हा त्यांच्या सरकारला अस्थिर करण्यासाठी अनेक गोष्टी केल्या गेल्या. त्यांना विरोधी पक्षनेता म्हणून स्वीकारण्यास नकार दिला. ज्या संविधानासाठी कर्पूरी ठाकूर यांनी जीवन व्यक्तीत केले, त्याग केला, त्यांचा अपमान काँग्रेसने केला, अशी टीका पंतप्रधान मोदी यांनी केली.

Web Title: How does Modi know before the elections that he will win 370 seats?; Suspicious question of Congress by adhir ranjan chowdhary

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.