नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी (दि. २५) जेवरमध्ये नॉयडा आंतरराष्ट्रीय विमानतळाची पायाभरणी केली. ६२०० हेक्टर क्षेत्रासह, हे आशियातील सर्वात मोठे विमानतळ असेल. विशेष म्हणजे ते प्रदूषणमुक्त असेल आणि यूपीचे पाचवे आंतरराष्ट्रीय विमानतळ असेल. विमानतळाच्या पायाभरणीनंतर पंतप्रधानांनी प्रदर्शनाला भेट दिली. तसेच विमानतळाच्या विकासाच्या प्रवासावर आधारित चित्रपट दाखवण्यात आला. मात्र, तत्पूर्वी या संभाव्य विमानतळाचे फोटो काही भाजपा नेते आणि मंत्र्यांकडून शेअर करण्यात आले होते. त्यावरुन, सोशल मीडियावर वाद निर्माण झाला आहे.
भाजपा नेते आणि उत्तर प्रदेशचे उप-मुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांनीही आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळाचा संदर्भ देत फोटो शेअर केले होते. मात्र, भाजपा नेत्यांनी शेअर केलेले हे फोटो चीनच्या बिजिंगमधील दॅक्सिन इंटरनॅशनल एअरपोर्टचे आहेत, असा दावा अनेकांना केला आहे. विशेष म्हणजे चीनी पत्रकार शेन शिवेई यांनीही उत्तर प्रदेशमधील कार्यक्रमात बिजिंग विमानतळाचेच फोटो वापरल्यासंदर्भात ट्विट केले आहे. त्यानंतर, तृणमूल काँग्रेसचे नेते आणि माजी क्रिकेटर किर्ती आझाद यांनी भाजपला आणि केंद्र सरकारला लक्ष्य केलंय.
चायनीज पत्रकार शेन शिवेई यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन हे फोटो शेअर करत, भारत सरकारचं हे वर्तन धक्कादायक असल्याचं म्हटलं आहे. आपली कामगिरी दाखविण्यासाठी पुरावा म्हणून चीनमधील बिजिंगचे दॅक्सिंग इंटरनॅशनल एअरपोर्टचे फोटो भाजपा नेते, मंत्री अनुराग ठाकूर आणि माय गव्हर्नमेंट हिंदी या ट्विटर अकाऊंटवरुन शेअर करण्यात आल्याचे शिवेई यांनी म्हटलं आहे. शिवेई यांच्या ट्विटचा स्क्रीनशॉट शेअर करत, काँग्रेस नेते किर्ती आझाद यांनी केंद्र सरकार आणि भाजपवर हल्लाबोल केला आहे.
मोठी कनेक्टिव्हिटी असलेले पहिले विमानतळ
पायाभरणीनंतर पंतप्रधान मोदींनी जनतेला संबोधित केले. यावेळी ते म्हणाले की, आज या विमानतळाच्या भूमिपूजनासोबतच दाऊ जी जत्रेचे प्रसिद्ध दागिनेही आंतरराष्ट्रीय नकाशावर कोरले गेले आहेत. त्याचा मोठा फायदा दिल्ली एनसीआर आणि पश्चिम उत्तर प्रदेशातील कोट्यवधी लोकांना होणार आहे. 21व्या शतकातील नवा भारत आजच्या तुलनेत उत्तम आधुनिक पायाभूत सुविधा निर्माण करत आहे. चांगले रस्ते, चांगले रेल्वे नेटवर्क, चांगले विमानतळ हे केवळ पायाभूत सुविधांचे प्रकल्प नाहीत, तर ते संपूर्ण प्रदेशाचा कायापालट करतात, लोकांचे जीवन बदलतात. कनेक्टिव्हिटीच्या दृष्टिकोनातूनही हे विमानतळ उत्तम मॉडेल बनवेल. येथे येण्यासाठी टॅक्सीपासून मेट्रो आणि रेल्वेपर्यंत प्रत्येक कनेक्टिव्हिटी असेल. विमानतळावरुन बाहेर पडताच तुम्ही थेट यमुना एक्सप्रेसवेवर येऊ शकता.