नवी दिल्ली - निवडणूक रणनितीकार आणि जनता दल युनायटेडचे माजी उपाध्यक्ष प्रशांत किशोर यांनी आगामी काळासाठीची आपली भूमिका स्पष्ट केली आहे. तसेच बिहारमध्ये अस्तित्वात असलेल्या भाजप आणि जनता दल युनायटेडच्या युतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करून जोरदार टीका केली आहे. महात्मा गांधी आणि नथुराम गोडसे यांची विचारधारा एकत्र कसकाय चालू शकते, असा सवाल किशोर यांनी उपस्थित केला आहे.
प्रशांत किशोर म्हणाले की, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आपल्यासाठी पितातुल्य आहेत. त्यांनी मला मुलासारखी वागणूक दिली. त्यांचा प्रत्येक निर्णय मला मान्य आहे. त्यांनी मला पक्षातून काढले त्यावर आपण नाराज नाही. यावेळी त्यांनी आपला आगामी कार्यक्रम घोषीत केला. येणाऱ्या 20 फेब्रुवारीपासून 'बात बिहार की' हे अभियान ते सुरू करणार आहेत.
या अभियानासाठी बिहारमधील 8 हजारहून अधिक गावांमधील नागरिकांना निवडण्यात येणार आहे. येणाऱ्या काळात बिहार आघाडीच्या 10 राज्यांमध्ये असावे, असा विचार करणाऱ्यांची निवड करण्यात आल्याचे त्यांनी म्हटले आहे. मात्र एखाद्या राष्ट्रीय पक्षासोबत जाणार का, यावर त्यांनी काहीही उत्तर दिले नाही.
दरम्यान भाजप-जदयू युतीवर त्यांनी हल्लाबोल केला. महत्मा गांधी आणि गोडसे यांची विचारधार भिन्न आहे. त्यामुळे हे दोघे एकत्र चालू शकत नाही, असा टोला त्यांनी जदयू-भाजप युतीला लगावला आहे. तसेच जदयू पक्ष भाजपसोबत जाऊन देखील बिहारच्या विकासासाठी उपयोग होत नसल्याचे प्रशांत किशोर यांनी नमूद केले.