नवी दिल्ली - 14 फेब्रुवारीला पुलवामा येथे जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेने सीआरपीएफच्या ताफ्यावर हल्ला केला. या हल्ल्यात 40 जवान शहीद झाले. या हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारतीय हवाई दलाने 26 फेब्रुवारी रोजी पाकिस्तानच्या बालकोट भागात घुसून जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या तळांना टार्गेट करत एअर स्ट्राईक केलं. नुकतान भारतीय हवाई दलाच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार या एअर स्ट्राईकला कोड नेम होतं ते ऑपरेशन बंदर.
ज्याप्रकारे हनुमानाने रावणाच्या लंकेत घुसून लंकादहन केलं होतं. त्याच रणनीतीवर या हल्ल्याची योजना आखली गेली. या हल्ल्याची गुप्तता पाळण्यासाठी या हल्ल्याला ऑपरेशन बंदर हे सांकेतिक नावं दिलं होतं अशी माहिती संरक्षण खात्यातील सूत्रांनी दिली होती. एका इंग्रजी वृत्तवाहिनीने या हल्ल्याच्या इनसाइड स्टोरीची बातमी दिली आहे. भारताने पाकिस्तानवर असा डाव साधला होता की शेवटपर्यंत पाकिस्तानला याची कल्पना नव्हती की, भारताचं टार्गेट बहावलपूर नाही तर बालकोट आहे.
बालकोट हल्ल्यासाठी ग्वालियर एअर बेसवरुन हवाई दलाच्या 20 पेक्षा अधिक लढाऊ विमानांनी उड्डाण घेतलं होतं. ग्वालियर एअर बेसच्या लोकांशिवाय हल्ल्यात पुढे काय घडणार याची कोणालाच माहिती नव्हती. हवाई दलाच्या विमानांनी पाकिस्तानच्या हवाई क्षेत्रात प्रवेश करताच भारताने यूएवी लॉन्च केलं. यूएवीचा आकारा जास्त मोठा नव्हता. पाकिस्तानला वाटलं भारत पुन्हा एकदा त्यांच्यावर सर्जिकल स्ट्राईक करायला येत आहे. त्यामुळे पाकिस्तानने तातडीने त्यांची एफ 16 ही दोन लढाऊ विमाने भारताच्या सीमेच्या दिशेने रवाना केली. याच दरम्यान काश्मीरच्या दिशेने 6 जगुआर विमानांनी उड्डाणं घेतली. पाकिस्तानला ऑपरेशनचं गांभीर्य दाखविण्यासाठी भारताने ही 6 जगुआर विमाने उडवली. या विमानाची दिशा बहावलपुरकडे जाण्यासाठी निघाल्याचं पाकिस्तानला भासविण्यात आलं. बहावलपुरमध्ये जैश-ए-मोहम्मदचं मुख्यालय आहे.
पाकिस्तानी हवाई दलाला वाटलं की, भारताची विमानं बहावलपुरच्या दिशेने पुढे येत आहेत. त्यामुळे पाकिस्तानने पुन्हा एकदा आपली एफ 16 विमाने बहावलपुरच्या दिशेने पाठविली. पाकिस्तानला चकमा देण्यासाठी भारताने रचलेला तो डाव होता. या चक्रव्युहमध्ये पाकिस्तान फसला आणि त्याचवेळी ग्वालियर येथून उड्डाण घेतलेली लढाऊ विमाने बालकोटला पोहचली आणि जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या प्रशिक्षण केंद्राला उद्ध्वस्त केलं. या ऑपरेशन बंदरमध्ये 5 ते 6 लढाऊ विमाने होती. ज्यांनी स्पाइस 2000 या इज्राईल बॉम्बचा हल्ल्यासाठी वापर केला. या हल्ल्यानंतर पाकिस्तानच्या हवाई दलाकडून 27 फेब्रुवारीला जम्मू काश्मीर जवानांच्या तळावर टार्गेट करण्याचा प्रयत्न केला मात्र भारतीय लष्कराने तो हाणून पाडला.