माजी पंतप्रधान एचडी देवेगौडांचा मुलगा आणि नातवामुळे कर्नाटकमध्ये भाजपप्रणित एनडीए अडचणीत आली आहे. लोकसभा निवडणुकीतच मुलगा आणि नातवाच्या दुष्कृत्यांचा व्हिडीओ बॉम्ब पडला आहे. सुमारे अडीज ते तीन हजार सेक्स टेप सापडल्याने कर्नाटकच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. याची भनक लागताच खासदार नातू रेवन्ना परदेशात पळून गेला आहे.
देवेगौडा यांचा आमदार मुलगा एचडी रेवन्ना आणि हासनचे खासदार प्रज्वल रेवन्ना यांच्यावर लैंगिक शोषणाचे गंभीर आरोप लागलेले आहेत. रेवन्ना यांच्या मतदारसंघातील लोकसभा निवडणूक झाली आहे. यानंतर लगेचच प्रज्वल जर्मनीला पळून गेले आहेत. या प्रकरणी कर्नाटक सरकारने एसआयटी चौकशी सुरु केली असून या समितीवरच त्याला परत भारतात आणण्याची जबाबदारी देण्यात आली आहे.
या प्रकरणी हासनमध्ये दोन गुन्हे नोंद करण्यात आले आहेत. यात एचडी रेवन्ना आणि प्रज्वल यांच्यासह नवीन गौडा नावाच्या व्यक्तीवरही गुन्हा नोंद करण्यात आला आहे. रेवन्नाचे कथित अश्लिल व्हिडीओ बाहेर येताच तो शनिवारी सकाळीच जर्मनीला पळून गेला आहे. आपली प्रतिमा मलिन करण्यासाठी हे व्हिडीओ बनविण्यात आले आहेत व ते व्हायरल केले जात आहेत, असा आरोप रेवन्ना याने केला आहे.
हे प्रकरण शेकतेय असे दिसताच देवेगौडा यांनी दोघांनाही पक्षातून निलंबित केले आहे. विरोधी पक्षांनी कर्नाटकात ठिकठिकाणी आंदोलने सुरु केली आहेत. तर बिहारचे राजदचे नेते तेजस्वी यादव यांनी मोदींवर टीका केली आहे. मोदी का गप्प आहेत, ते तर रेवन्नाच्या प्रचाराला आले होते. आरोपींवर कठोर कारवाई करण्याऐवजी भाजपा त्यांना देशातून पळायला मदत करते, हेच लोक बेटी बचावचे नारे देत होते, असा गंभीर आरोप केला आहे.